मात्र करोना संकटही टळले नसल्याचा दीपक पारेख यांचा इशारा

मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेची मूलतत्त्वे मजबूत असून अर्थउभारीही प्रगतिपथावर आहे; मात्र करोना साथीचे मुख्य आव्हानही कायम आहे, असे प्रतिपादन आघाडीचे उद्योजक दीपक पारेख यांनी केले आहे.

एचडीएफसी लिमिटेडचे अध्यक्ष दीपक पारेख मंगळवारी कंपनीच्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित केले. भक्कम मूलभूत पायावर अर्थप्रगती होत असली तरी करोनाविषयक अनिश्चिततेची टांगती तलवार कायम असल्याचे ते म्हणाले.

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात गेल्या वर्षांसारखीच स्थिती दिसत असून परिणामी चालू वित्त वर्षांच्या पहिल्या सहामाहीत अर्थव्यवस्था काही प्रमाणात मंदीसदृश असेल, असेही पारेख यांनी यावेळी सांगितले.

देशाची परकीय गंगाजळी आणि थेट विदेशी गुंतवणुकीचा ओघ विक्रमी स्तरावर असून भांडवली बाजार तसेच भक्कम अन्नधान्य उत्पादनामुळे कृषी क्षेत्रातील सुगीचीही आशा असल्याचे पारेख म्हणाले.

पारेख यांनी यावेळी केंद्र सरकार तसेच रिझव्‍‌र्ह बँकेने केलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले. देशाच्या वृद्धीसाठी पतधोरणाच्या माध्यमातून मध्यवर्ती बँकेचे पाठबळ, करोनाचा फटका बसलेल्या क्षेत्राला चालना म्हणून सरकारने देऊ केलेल्या भरीव अर्थसाहाय्याचा त्यांनी उल्लेख केला.

बँका, वित्त संस्थांमार्फत होणाऱ्या कर्ज वितरणाबाबत काहीशी चिंता व्यक्त करताना पारेख यांनी ही स्थिती काही कालावधीसाठी राहण्याची शक्यता वर्तवली. तंत्रस्नेही पायाभूत सेवांची मागणी दिवसेंदिवस वाढत असून रोकड सुलभता, वृद्धी आणि मालमत्ता गुणवत्ता ही त्रिसूत्री वैश्विक साथ कालावधीतही अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची ठरेल, असे पारेख म्हणाले. देशव्यापी टाळेबंदीने व्यक्तिगत कर्जदात्यांवर विपरीत परिणाम झाला असला तरी निर्बंध पूर्णत: शिथिल झाल्यानंतर कर्जमागणीत वाढ दिसून येईल, असे त्यांनी सांगितले.

‘एडीबी’चा १० टक्के विकास दराचा अंदाज

करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या परिणामांबाबत चिंता व्यक्त करताना आशियाई विकास बँकेने (एडीबी) देशाच्या विकास दराचा अंदाज घटवला आहे. यापूर्वी वर्तविलेला ११ टक्क्य़ांचा अंदाज घटवून तो २०२१-२२ साठी १० टक्क्य़ांवर तिने आणला आहे.