देशाच्या कारखानदारीतील मरगळ कायमच असून, त्यात कोणत्याही सुधाराऐवजी उलट मंदी पसरत चालली असल्याचे शुक्रवारी जाहीर झालेल्या ऑक्टोबर महिन्याच्या ४.२ टक्क्य़ांनी आकसलेल्या औद्योगिक उत्पादन दरातून स्पष्ट झाले. गेल्या दोन वर्षांतील ही सर्वात मोठी व भयंकर चिंताजनक घसरण असून, भांडवली वस्तू आणि ग्राहकोपयोगी उत्पादने दोन्हींमध्ये ती सारखीच पसरली आहे.
सप्टेंबर २०१४ या आधीच्या महिन्यात औद्योगिक उत्पादन दरात १.२ टक्क्य़ांची वाढ झाली होती, तीही केंद्रीय सांख्यिकी विभागाने सुधारून २.८ टक्के असल्याचे शुक्रवारी सांगितले. तर त्यानंतरच्या महिन्यात उणे प्रवास रुंदावून ४.२ टक्क्य़ांवर गेल्याचे ताजे निवेदन स्पष्ट करते.
या निर्देशांकाचा बहुतांश म्हणजे पाऊण हिस्सा व्यापणाऱ्या निर्मिती क्षेत्राने उणे ७.६ टक्के असा दर ऑक्टोबरमध्ये दाखविला, जो वर्षभरापूर्वी याच महिन्यात उणे १.३ टक्के होता. बाजारातील ग्राहकांच्या मागणीचा अंदाज देणाऱ्या भांडवली वस्तूंच्या उत्पादनातही अधोगती सुरू असून ती ऑक्टोबरमध्ये २.३ टक्क्य़ांची होती. तर ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्राची तब्बल १८.६ टक्क्य़ांनी अधोगती झाली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर २०१४ अशा सात महिन्यांत, केवळ मे व सप्टेंबर महिन्यांत औद्योगिक उत्पादन दर  उंचावलेला दिसून आला आहे. तर या सात महिन्यात एकंदर ग्राहकोपयोगी उत्पादनांचा दर ६.३ टक्क्य़ांनी आकसला आहे. बाजारात ग्राहकांच्या मागणीला बहर येऊ शकलेला नाही असेच चित्र या आकडय़ांमधून दिसून येते.