किरकोळ महागाई पाठोपाठ सप्टेंबरमधील घाऊक किंमत निर्देशांकही नरमला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर गेल्या महिन्यातील किरकोळ तसेच घाऊक किंमत निर्देशांक किमान स्तरावर आल्याने खरेदीदारांच्या उत्साहपूर्ण वातावरणात भर पडली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण नुकतेच जाहिर झाले असले तरी सणांच्या मोसमात कमी व्याजदराच्या भेटीची आस उंचावली आहे. ऑगस्टमधील औद्योगिक उत्पादन दर ०.४ टक्के स्थिर राहिल्यानंतर विकासवाढीला चालना देण्यासाठी व्याजदर कपातीची अपेक्षा उद्योगांनीही व्यक्त केली आहे.
घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित सप्टेंबरमधील घाऊक महागाई दर २.३८ टक्क्यांवर येताना गेल्या पाच वर्षांच्या किमान स्तरावर येऊन ठेपला आहे. अन्नधान्यांच्या पदार्थाचे दर जवळपास तीन वर्षांच्या तळात आल्याने घाऊक किंमत निर्देशांक स्थिरावला आहे. त्यातील अन्नधान्याचा किंमत निर्देशांक ३.५२ टक्के अशा ३३ महिन्याच्या नीचांकावर नोंदला गेला आहे. सलग चौथ्या महिन्यात महागाई दर कमी झाला आहे.
ऑगस्टमध्ये घाऊक किंमत निर्देशांक ३.७४ टक्के तर सप्टेंबर २०१३ मध्ये हा दर ७.०५ टक्के होता. घाऊक किंमत निर्देशांकातील कांद्याचे दर तब्बल ५८.१२ टक्क्यांनी कमी झाले आहेत. आधीच्या महिन्यातही हे दर ४४.७० टक्क्यांनी रोडावले होते. तर भाज्यांच्या किंमती गेल्या महिन्यात १४.९८ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. गेल्या महिन्यातील ६१.६१ टक्क्यांच्या तुलनेत बटाटय़ाच्या किंमती मात्र सुमारे ९०.२३ टक्क्यांनी वधारल्या आहेत. तर फळे, दूध व मासांहरी पदार्थामध्ये यंदा किरकोळ दर वाढ नोंदली गेली आहे. सणवारासाठी अधिक उपयोग होणारी साखर, खाद्यतेल यांचे दर २.८४ टक्क्यांनी कमी झाले आहेत. स्वयंपाकाचा गॅस, ऊर्जा यामध्येही १.३३ टक्क्यांची घसरण झाली आहे.
सोमवारी जाहिर झालेला सप्टेंबरमधील ६.४६ टक्के किरकोळ महागाई दर हा गेल्या अडिच वर्षांच्या नीचांकावरील आहे. सप्टेंबरमधील किरकोळ महागाई दर १९ महिन्यांच्या तळात येऊन विसावला आहे. अडिच वर्षांपूर्वीच, जानेवारी २०१२ मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक पद्धतीवर मोजमाप करणारा महागाई दर जाहिर करण्याची यंत्रणा अस्तित्वात आली होती. त्यानंतर प्रथमच हा दर किमान स्तरावर आला आहे. भाज्यांसह फळांच्या किंमती कमी झाल्याने सप्टेंबरमधील महागाई दर ऑगस्टमधील ७.७३ टक्क्य़ांपेक्षा कमी नोंदला गेलो. किरकोळ महागाई दरांमध्ये जुलैपासून नरमाई नोंदली जात आहे.
वाढत्या व्याजदरापोटी गव्हर्नरपदाची वर्षपूर्ती करतानाही रिझव्‍‌र्ह बँकेच्या डॉ. रघुराम राजन यांनी सलग चार पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवले होते. जानेवारी २०१४ पासून स्थिर व्याजदर ठेवणाऱ्या मध्यवर्ती बँकेचे आगामी पतधोरण आता २ डिसेंबर रोजी जाहिर होणार आहे. सध्याची महागाईतील नरमाई पाहता व्याजदर कपातीचा निर्णय त्यावेळी होतो की त्वरित त्यावर निर्णय घेऊन राजन हे कर्जदारांना स्वस्त व्याजदराची भेट देतात, हे पहावे लागेल. रिझव्‍‌र्ह बँकेने जानेवारी २०१५ पर्यंत ८ टक्के तर पुढील वर्षभरात ६ टक्के महागाई दराचा अंदाज वर्तविला आहे. पहिल्या अर्धवार्षिकातील महागाई दर २.६१ टक्के नोंदला गेला आहे. वर्षभरापूर्वीच्या एप्रिल ते सप्टेंबर दरम्यानच्या ६.२३ टक्क्यांच्या तुलनेत तो निम्म्यापेक्षाही कमी आहे.

जागतिक स्तरावर इंधनासह वायदा वस्तुंच्या किंमती कमी झाल्याचा परिणाम येथील वस्तुंवरही जाणवला आहे. यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेलाही व्याजदराबाबत नव्याने विचार करण्यारे पोषक वातावरण तयार झाले आहे.
– चंद्रजीत बॅनर्जी, महासंचालक,भारतीय औद्योगिक महासंघ.

महागाईवर असलेला दबाव आता कमी झाला आहे, हेच या आकडेवारीवरून सिद्ध होते. महागाईबाबत रिझव्‍‌र्ह बँकेच्या असलेल्या उद्दिष्टाकडे त्याची वाटचाल सुरू आहे.
– फिक्की.

महागाई आता कमी झाल्याने रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दर कमी करण्याची आवश्यकता आहे. औद्योगिक वाढ राखण्यासाठी आणि मागणीत वृद्धी नोंदविण्यासाठी हे पाऊल आवश्यक ठरेल.
– पीएचडीसीसीआय.

सप्टेंबरमधील दोन्ही प्रमुख महागाई निर्देशांकाकडे पाहणे रिझव्‍‌र्ह बँकेच्या दृष्टिने महत्त्वाचे ठरेल. आणि यानुसार व्याजदर कमी करून उद्योगाला, अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.
– राणा कपूर, अध्यक्ष, असोचेम.