संस्थापकांव्यतिरिक्त बनलेले इन्फोसिसचे पहिले मुख्याधिकारी विशाल सिक्का यांनी शुक्रवारी अचानक दिलेल्या राजीनाम्यानंतर या जागेवर पुन्हा एक संस्थापक व पूर्वाश्रमीचे मुख्याधिकारी नंदन निलेकणी यांना आणण्याच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत. भांडवली बाजारात सूचिबद्ध या कंपनीत वर्चस्व असलेल्या गुंतवणूकदार संस्था सल्लागारांनी निलेकणी यांच्या नावाची शिफारस कंपनीच्या संचालक मंडळाला केली आहे. ५० वर्षीय विशाल सिक्का यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन, एकूण उद्योग क्षेत्रात खळबळ उडवून दिली.  अमेरिकेत वास्तव्यास असतानाच त्यांनी हे राजीनामा पत्र दिले. त्यानंतर सकाळी ९ वाजता बंगळुरूस्थित मुख्यालयात कंपनीने तातडीने प्रसारमाध्यमांसमोर हंगामी मुख्याधिकारी म्हणून यू. बी. प्रवीण राव यांच्या नावाची घोषणा केली. कंपनीचे सहअध्यक्ष रवी व्यंकटेश हे या वेळी उपस्थित होते, तर या पत्रकार परिषदेला सिक्का यांनी अमेरिकेतून दृक्-श्राव्य परिषदेच्या (व्हिडीओ कॉन्फरन्स) माध्यमातून संबोधित केले.

सिक्का यांनी या वेळी राजीनाम्याचे कारण स्पष्ट केले. कंपनीच्या वतीने सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी जाहीरपणे केलेल्या आरोपांचे खंडन करणारे स्पष्टीकरण देण्यात आले. एकूण सिक्का यांच्या बाजूने कंपनीच्या अध्यक्षांसह संचालक मंडळ तर दुसऱ्या बाजूला नारायण मूर्ती यांच्यासह संस्थापकाचा गट असा संघर्ष तीव्र स्वरूपात पुढे येताना दिसत आहे.  कंपनीच्या मुख्याधिकाऱ्याची सूत्रे आता अनुभवी व सहसंस्थापक, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदन निलेकणी यांच्याकडे देण्याविषयी संचालक मंडळावर दबाव वाढत आहे.  निलेकणी हे २००२ ते २००७ या दरम्यान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत राहिले आहेत.

सीईओपदाचा यू. बी. राव यांच्याकडे तात्पुरता कार्यभार

मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालकपदाची तात्पुरती धुरा हाती आलेले यू. बी. प्रवीण राव हे इन्फोसिसमध्ये गेल्या तीन दशकांपासून आहेत. मुख्य परिचलन अधिकारीपदाचा कार्यभार असलेले व १९८० मध्ये इन्फोसिसमध्ये रुजू झालेले राव हे इन्फोसिस बीपीओचे अध्यक्षही आहेत. कंपनीत त्यांनी पायाभूत व्यवस्थापन सेवा, युरोपमधील व्यवसाय, ग्राहक व किरकोळ विभाग आदी विभागांची जबाबदारी हाताळली आहे. बंगळूरु विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकी पदवी मिळविणारे राव हे माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे संघटन असलेल्या नासकॉम, भारतीय उद्योग संघटना (सीआयआय)च्या विविध समित्यांवरही कार्यरत आहेत. राव यांचे वेतन ३३ टक्क्यांनी वाढविल्याबद्दल संस्थापक मूर्ती यांनी इन्फोसिसच्या संचालक मंडळाच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

मार्च २०१८ पर्यंत नवीन मुख्याधिकारी निवड अटळ

मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा सिक्का यांनी राजीनामा दिला असला तरी नव्या पदाची पूर्णवेळ नियुक्ती होत नाही तोवर सिक्का हे कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून कार्यरत राहतील. सिक्का यांच्याकडील सध्याचा पदभार यू. बी. राव यांच्याकडे राहणार असून कंपनीला मार्च २०१८ पर्यंत नवीन मुख्याधिकारी नियुक्त करणे गरजेचे आहे.

नंदन निलेकणींसाठी गुंतवणूकदार संस्था आग्रही

इन्फोसिसचे एक सहसंस्थापक नंदन निलेकणी यांना समूहात पुन्हा बोलाविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कंपनीच्या गुंतवणूक सल्लागार मंडळाने निलेकणी यांच्या नावाची शिफारस केली आहे. मुख्याधिकारीपदी सिक्का यांना टिकवून ठेवण्यात आलेले अपयश पाहता, संचालक मंडळाने पूर्वाश्रमीचे मुख्याधिकारी निलेकणी यांना बिगर  कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करावे, असे गुंतवणूकदार सल्लागार संस्थेने म्हटले आहे. मूर्ती यांच्याप्रमाणेच एक संस्थापक असलेले निलेकणी २००२ ते २००७ दरम्यान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. यानंतर त्यांची यूआयडी प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली होती.

दिवसात बाजारमूल्याला २७,००० कोटींचा फटका

सिक्का यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताने भांडवली बाजारासह इन्फोसिसच्या समभागात मोठी पडझड दिसून आली. जवळपास एक टक्क्यांची निर्देशांक घसरण नोंदविणाऱ्या भांडवली बाजारात कंपनीचा समभाग व्यवहारात तब्बल १३ टक्क्यांनी आपटून, बहुवार्षिक नीचांकपदाला पोहोचला होता. तर दिवसअखेर तो गुरुवारच्या तुलनेत ९.६० टक्क्यांनी घसरून ९२३.१० रुपयांवर स्थिरावला. एकाच व्यवहारात कंपनीच्या बाजारमूल्याची झीज २७,००० कोटी रुपयांच्या घरात जाणारी ठरली. दिवसअखेर कंपनीचे बाजारमूल्य २,१२,०३०.९६ कोटी रुपयांवर स्थिरावले.