विमा क्षेत्राच्या दृष्टीने २०१५ चांगले गेले, अशी भावना असलेल्या एक्साईड लाईफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी क्षितिज जैन यांनी २०१६ मध्येही दुहेरी आकडय़ातील व्यवसाय वृद्धीबद्दल विश्वास व्यक्त केला आहे.
* गेले वर्ष या क्षेत्रासाठी कसे गेले? २०१६ विमा क्षेत्रासाठी कसे असेल, असे तुम्हाला वाटते?
२०१५ मध्ये भारतीय विमा क्षेत्र रुळावर आलेले आपण पाहिले. भांडवली बाजारातील सुस्थिती आणि गुंतवणूकदारांची मागणी हे त्यासाठी कारण देता येईल. ग्राहकांकडूनही परिणामक गूंतवणूक आणि उत्पादनांचा प्रतिसाद या वर्षांत राहिला आहे. हेच चित्र २०१६ मध्येही दिसेल, असा विश्वास आहे. चालू वर्षांत या उद्योगाची वाढ १० ते १५ टक्के दराने होण्यास हरकत नाही.
आणखी एक सांगायचे म्हणजे देशांतर्गत बाजारपेठेत जिथे स्थावर मालमत्ता आणि मौल्यवान धातू क्षेत्रात गेल्या वर्षांत काहीशी ओहोटी अनुभवली गेली. तुलनेत विमा उद्योगाने चांगले स्थान राखले. वाढती स्पर्धा आणि नियमांमधील बदल हेदेखील या क्षेत्राने गेल्या पाच वर्षांत सर्वोत्तम असे अनुभवले. माफक वाढ या उद्योगाने पाहिली, असे माझे वैयक्तिक मत आहे. या वर्षांत विक्री झालेल्या विमा योजनांची संख्याही वाढली.
* अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. या उद्योगाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या असे वाटते काय?
विमा क्षेत्राच्या दृष्टीने यंदाच्या अर्थसंकल्पात काही तरतुदी दिसल्या. विमा, आरोग्य यावर भर दिला आहे. कृषी, सिंचन तसेच कृषी विमा सारख्या बाबींनाही हात लावला गेला आहे. विमा क्षेत्राकरिता सरकार गंभीर आहे, हे दिसते. आयुर्विमेकरिता असलेली मर्यादा (कर सवलत) वाढवायला हवी होती. विमा योजनांवरील सेवा कराबाबतची शिथीलता या उद्योगाच्या भरभराटीकरिता निश्चितच पूरक ठरेल. यामुळे या क्षेत्रातील गुंतवणूकही वाढण्यास मदत होईल.
* विमा क्षेत्रातील प्रसार तेवढय़ा प्रमाणात झाला आहे, असे वाटते का? विमा खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या मानसिकतेत तसा बदल जाणवतो का?
विमा खरेदीदारांच्या मानसिकतेत खूपच बदल झाला आहे, असे माझे निरिक्षण आहे. निवडक योजनांसाठी त्यांचा आग्रह दिसतो. या गुंतवणुकीतील जोखीमबाबतही ते सावध असल्याचे जाणवते. विमा छत्र, आरोग्यलाभ, निवृत्ती नियोजन याबाबत त्यांचे प्रश्न असतात. योग्य परिणामकारक उत्पादनांसाठी ते आग्रही आहेत. लाभ, परताव्याबाबत त्यांची उत्सुकता दिसते. यामुळे कंपन्यांनाही विमा प्रसाराकरिता अधिक योगदान देता येते. प्रसंगी कंपन्याही समाजमाध्यमासारखा उपयोग अंमलात आणतात.
* एक्साईड लाईफ इन्शुरन्सच्या काही विस्तार योजना आहेत का?
गेल्या वर्षभरात आम्ही वार्षिक २२ टक्के दराने व्यवसाय विकास साधला आहे. आजवर आमचे १५ लाख विमाधारक-ग्राहक आहेत. कंपनीची २०० कार्यालये आणि ३५ हजार व्यासपीठाद्वारे आम्ही ते अधिक वाढविण्याच्या प्रयत्नात आहोत. अनेक शेडय़ुल्ड आणि सहकारी बँकांबरोबर आम्ही विमा योजना विक्रीकरिता भागीदारी केली आहे. यामाध्यमातून देशभरातील १,००० बँक शाखांमध्ये कंपनीच्या योजनांचे अस्तित्व असेल. कंपनी प्रतिनिधी, दलाल यांच्याद्वारेही ग्राहकांपर्यंत आमचा प्रयत्न आहे. विमा संस्थांवरील आमचा भर यापुढेही कायम असेल. आमच्या एकूण संपर्क व्यवसायापैकी आम्ही ६० टक्क्य़ांपर्यंत या गटावर अवलंबून आहोत. त्यामुळे १० ते १५ टक्के वेग सहज राखता येईल. थेट माध्यमातूनही कंपनीच्या विविध योजना ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यावर आम्ही भर देत आहोत. संकेतस्थळाच्या माध्यमातून थेट विमा उत्पादने विक्रीकरिता आम्ही प्रयत्नशील आहोतच. विमा क्षेत्रातील नव्या नियमाचा, बँकांना तीन कंपन्यांच्या विमा योजना विक्री करू देण्याच्या मुभेचा लाभ आम्हालाही होईलच. नव्या आर्थिक वर्षांपासून त्याची अंमलबजावणी होईल. विमा नियामक संस्था ‘ईर्डाई’ने याबाबत खूपच सकारात्मक निर्णय घेतला आहे. ही संधी साधण्याचे आमचे ध्येय आहे.
* नेमकी कशी उत्पादने-योजनांवर तुम्ही भर देण्याचा प्रयत्न करणार आहात?
प्रत्येक विमाधारकाच्या त्याच्या आयुष्यातील निरनिराळ्या टप्प्याकरिता उत्पादने देण्याचे आमचे प्रयत्न असतात. पारंपरिक, दिर्घकालीन बचत योजना तसेच यूलिपसारख्या विमा योजना आम्ही याही वर्षांत कायम ठेवू. चालू आर्थिक वर्षांचे ही शेवटची तिमाही आहे. तेव्हा व्यवसायासाठीही ती महत्त्वाची आहेच. तित मर्यादित देय बतच तसेच विमा आणि बचत योजना अशी सांगड घालणारी उत्पादने आहेत. आमच्या वैयक्तिक १७ विमा योजना आहेत. तर सहा समूह उत्पादने. आमच्या एकूण उत्पादनांपैकी ८५ टक्के उत्पादने ही पारंपरिक स्वरुपाची असून ११ टक्के ही यूलिप तर ४ टक्के ही निवृत्त गटातील उत्पादने आहेत.