मुंबई : सर्वागाने सुरक्षितता हव्या असलेल्या गुंतवणूकदारांसाठी रोखेसंलग्न अर्थात डेट योजना सर्वाधिक पसंतीचा पर्याय ठरत आहे. सध्या म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये नियोजनबद्ध गुंतवणुकीचे लोकप्रिय माध्यम ठरलेल्या ‘एसआयपी’ पद्धतीनेही डेट फंडातही मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक ओघ सुरू आहे, असे महिंद्र म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष बिश्नोई यांनी प्रतिपादन केले.

रोखेसंलग्न फंडांनी दिलेल्या जोखीमसंतुलित परताव्याची ऐतिहासिक कामगिरी पाहता, तो गुंतवणूकदारांसाठी आकर्षक राहिला आहे. मुख्यत: बँकांमधील मुदत ठेवी, आवर्ती ठेवी, पोस्टाच्या अथवा तत्सम अल्पबचत योजनांसारख्या पारंपरिक पर्यायांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना, तितकीच सुरक्षितता परंतु तुलनेने अधिक लाभ या पर्यायाने दिला असल्याचे आता सामान्य गुंतवणूकदारांच्याही लक्षात येत असल्याचे बिश्नोई यांनी सांगितले.

आजवर स्थिर उत्पन्न पर्यायातील लिक्विड तसेच लो डय़ुरेशन फंडांचा वापर हा बहुतांश बडे उद्योग, संस्थात्मक गुंतवणूकदार तसेच उच्च संपदा असणारे व्यक्ती (एचएनआय) करीत असल्याचे दिसत होते, परंतु आता छोटे व्यक्तिगत गुंतवणूकदारही त्याचा खुबीने वापर करीत आहेत, असे निरीक्षण बिश्नोई यांनी नोंदविले. अगदी पगारदारही दरमहा त्यांचे वेतन बँकेत जमा होण्यासरशी लिक्विड फंडात, जशी गरज पडेल तसे ते काढू लागल्यास त्यांना यातून चांगला लाभ कमावता येतो असे दिसून आले आहे.

येत्या काळात महिंद्र म्युच्युअल फंडांकडून विद्यमान लिक्विड फंड आणि अल्प मुदतीच्या रोखे योजनांमध्ये भर घालणारी काही नावीन्यपूर्ण योजना आणणार असल्याचे बिश्नोई यांनी स्पष्ट केले. ‘अक्रुअल’ फंडासारख्या पर्यायांचा विचार सुरू असल्याचे ते म्हणाले. दोन ते तीन वर्षांचे आर्थिक उद्दिष्ट राखून गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी डेट फंड हा उमदा पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले.