दिवाळीच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’ने गुंतवणूकदारांसाठी योजलेल्या अर्थसाक्षर फराळाची ही दुसरी थाळी..

कोणत्याही व्यक्तीला दोन प्रकारचे खर्च असतात. पहिला दर महिन्याच्या महिन्याला करायला लागणारा खर्च आणि दुसरा भविष्यात करावा लागणारा मोठा खर्च. सर्वसाधारणपणे महिन्याचे खर्च मासिक वेतनातून भागविले जातात आणि भविष्यातील मोठय़ा खर्चाची ताजवीज महिन्याच्या बचतीतून केली जाते. भविष्यातील मोठे खर्च मग मुलांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा स्वत:च्या सेवानिवृत्ती पश्चातच्या उदरनिर्वाहासाठी केलेली तरतूद असो याची ताजवीज बचतीतून होत असते. गुंतवणुकीचा निर्णय घेण्याआधी काही गोष्टी विचारात घेण्याची गरज आहे. पहिला धोका सध्याच्या अनिश्चिततेच्या वातावरणात कुटुंबाच्या उत्पन्नात कपात संभवू शकते. दुसरा मुद्दा असा की, गुंतविलेल्या भांडवलाची सुरक्षितता आणि तिसरा भांडवलाची वृद्धी. सुरक्षितता आणि वृद्धी यांचा समतोल साधणे गरजेचे आहे. सुरक्षिततेकडे अधिक लक्ष दिले तर संभाव्य नफ्याला (भांडवली वृद्धीला) मुकावे लागते.

कुटुंबाच्या उत्पन्नात कपात होण्याची संभाव्य कारणांपैकी कुटुंबातील कामावात्या व्यक्तीचा अकाली मृत्यू हे एक करण असू शकते. कुटुंबाची सुरक्षितता ही सर्वोच्च असल्याने कमावत्या व्यक्तीचा टर्म प्लान ही कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता देण्याची पहिली पायरी आहे. याच्याच जोडीला अपघाती विमा असणे गरजेचे झालेले आहे. एखाद्या अपघातामुळे वैद्यकीय कारणांनी दीर्घकाळ घरी राहावे लागले तर दरम्याच्या कालावधीतील उपचाराच्या खर्चाची आणि उत्पन्न गमावण्यामुळे झालेल्या नुकसानाची अंशत: भरपाई करणारी विमा उत्पादने उपलब्ध आहेत या विमा उत्पादनाचासुद्धा विचार करणे गरजेचे आहे. तसेच अशा आणीबाणीच्या प्रसंगी उपलब्ध व्हावा अशी रोकडसुलभ गुंतवणूक असणे गरजेचे झाले आहे. साधारण सहा महिन्यांच्या खर्चाइतकी रकमेची तरतूद असणे गरजेचे आहे.

या वित्तीय नियोजनातील प्राथमिक बाबी आहेत. यांची पूर्तता झाल्यानंतरच दुसऱ्या गुंतवणुकीच्या टप्प्याचा विचार करणे योग्य ठरेल. माझी गुंतवणुकीतील जोखीम सहन करण्याची क्षमता किती आहे किती वर्षे मी सक्रिय कमावता असणार आहे यानुसार गुंतवणूक कशात करायची याचा निर्णय घेणे गरजेचे असते. भांडवली सुरक्षितता आणि भांडवलीवृद्धी यांच्यात व्यस्त प्रमाण आहे. प्रत्येकालाच  मोठी भांडवली वृद्धी हवी असते. परंतु भांडवली वृद्धीसाठी आवश्यक असलेली जोखीम स्वीकारण्याची माझी क्षमता आहे का याचा विचार करणे गरजेचे असते. जोखीम स्वीकारण्याची क्षमता वाढविण्यासाठी वर उल्लेख केलेल्या पहिल्या टप्प्यातील गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे. आयुष्यात उपभोगलासुद्धा तितकेच महत्त्व आहे. कुटुंबीयासोबत एखादा चित्रपट बघणे, एखाद्या चांगल्या उपाहारगृहात घेतलेल्या भोजनाचा आस्वाद किंवा कुटुंबीयांसोबत केलेला दूरचा प्रवास भविष्यातील नवी आव्हाने पेलण्यास शरीर आणि मानला तजेलदार बनवतो.

माझे आजचे वय आणि हातात असलेला काळ या दोघांचा ताळमेळ घालणे गरजेचे असते. चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर व्यवस्थापन. समभाग संलग्न गुंतवणुकीवर मिळालेली भांडवली वृद्धी करमुक्त असते, तर रोखे गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडांतील भांडवली वृद्धीला इंडेक्सेशनचा लाभ मिळण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी निर्धारित केला आहे. उपभोगाबरोबरच समाजिक दायित्व हासुद्धा आर्थिक नियोजनातील एक मुद्दा लक्षात घ्यावा. आपण समाजाचे नक्कीच देणे लागतो. आपल्या गरजांचा विचार करताना जे अभागीजन आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाहीत अशांसाठी आपल्या उत्पन्नातील थोडा वाटा बाजूला काढणे हे ज्याच्या जाणिवा बोथट झालेल्या नाहीत ते नक्कीच आपले कर्तव्य समाजातील. माझ्या मते, या सर्व गोष्टींचा विचार करून मिळालेल्या बोनसचे योग्य विनियोग करावा.

(लेखक एलआयसी म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)