निकाल हंगामाची बहारदार सुरुवात..

व्यापार प्रतिनिधी, मुंबई</strong>

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अव्वल दोन स्थानावर असलेल्या टीसीएस आणि इन्फोसिस या कंपन्यांच्या सरलेल्या २०१८-१९ आर्थिक वर्षांच्या अंतिम तिमाही आणि वार्षिक वित्तीय कामगिरी शुक्रवारी घोषित झाली. दोन्ही सलामीवीर कंपन्यांनी सलग तिमाहीत निव्वळ नफ्यात दोन अंकी दराने वाढीची कामगिरी नोंदवून निकाल हंगामाची दमदार सुरुवात केली आहे.

इन्फोसिसने ३१ मार्च २०१९ अखेर ४,०७३ कोटी रुपयांचा तिमाही निव्वळ नफा कमावला असून, वर्षांगणिक तो १० टक्के वाढला आहे. तिमाहीसाठी कंपनीचे महसुली उत्पन्नही १९.१ टक्के वाढून २१,५३९ कोटी रुपये झाला आहे. इन्फोसिसने सलग दुसऱ्या तिमाहीत नफ्यात व महसुलात दोन अंकी दराने वाढ साधली आहे.

टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस अर्थात टीसीएसने सलग पाचव्या तिमाहीत महसुलात दोन अंकी दराने वाढ साधली आहे. ३१ मार्च २०१९ अखेर तिमाहीत कंपनीने अनुक्रमे ३८,०१० कोटी रुपयांचा महसूल आणि ८,१२६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. वर्षांगणिक त्यात अनुक्रमे १२.७ टक्के आणि २२ टक्के दराने वाढला आहे.

टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथ यांनी ही यंदाची ही गेल्या १५ तिमाहीमधील सर्वात दमदार महसुलीवाढीची कामगिरी असल्याचे सांगितले. आधीच्या तीन तिमाहींच्या तुलनेत आगामी कार्यादेशही सशक्त असून, त्यात भविष्यात वाढीच्या शक्यताही अधिक आहेत. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षही असेच उज्ज्वल कामगिरीचे असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्या उलट आगामी आर्थिक वर्षांत साधारण ७.५ टक्के ते ९.५ टक्के दराने महसुली वाढ साधली जाईल, असे संकेत इन्फोसिसकडून देण्यात आले. विद्यमान कामगिरीच्या तुलनेत आगामी कामगिरीबाबत दृष्टिकोन फारसा आशावादी नसण्याची बाब नकारात्मक असल्याचे विश्लेषकांनी मत नोंदविले.

भागधारकांना लाभांश नजराणा

टीसीएसने निकालांबरोबरच भागधारकांना अंतिम लाभांश म्हणून प्रति समभाग १८ रुपये देण्याची घोषणा केली आहे. इन्फोसिसनेही प्रति समभाग १०.५० रुपयांचा अंतिम लाभांश घोषित केला आहे. दोन्ही कंपन्यांचे निकाल हे शुक्रवारचे भांडवली बाजारातील व्यवहार संपुष्टात आल्यानंतर जाहीर झाल्याने, समभागांमध्ये त्याचे पडसाद हे सोमवारच्या व्यवहार सत्रातच अनुभवता येतील.