येथील जैन इरिगेशनमार्फत विकसित करण्यात आलेल्या जैन सौर वॉटर फिल्टरचा अमेरिकेतील यूएसएड व इतर संस्थांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘डेसल प्राइज’ने गौरव करण्यात आला आहे. या जलशुद्धीकरण युनिटसाठी जैन इरिगेशन आणि अमेरिकेतील एमआयटी यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव व बोस्टन येथील एमआयटी संस्थेत संशोधन सुरू होते. 

क्षार व इतर प्रदूषित असलेल्या पाण्याला सौर तंत्रज्ञानाने स्वयंचलित फिल्टरने शुद्ध करून ते पिण्याचे पाणी शहरी व ग्रामीण भागातील जनतेला देता येऊ शकेल, यावर संशोधनात लक्ष केंद्रीत करण्यात आले होते.
अमेरिका, स्वीडन, नेदरलँड्स यांच्या वतीने यूएसएड या जागतिक विकासासाठी कार्यरत संस्थेमार्फत अन्न सुरक्षिततेसाठी पाणी व्यवस्थापन या विषयासंदर्भात एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ाअखेर स्पर्धा घेतली गेली. यासाठी जगभरातील सौर ऊर्जा शास्त्रज्ञ, जलशुद्धीकरण तज्ज्ञ आणि उत्पादक कंपन्या सहभागी झाल्या होत्या.
२१ देशांतील ६८ प्रवेशिकांमधून सहा प्रवेशिका अंतिम फेरीसाठी निवडल्या गेल्या.
जैन इरिगेशन व एमआयटी बोस्टनने संयुक्तरित्या विकसित केलेल्या वॉटर फिल्टरने जागतिक आरोग्य संघटनेने ठरविलेल्या सर्व निकषांची पूर्तता केली. सलग सहा दिवसांच्या परीक्षणानंतर निवड समितीने जैन इरिगेशन व एमआयटी बोस्टन यांनी विकसित केलेल्या सौर उर्जा स्वयंचलीत जलशुद्धीकरण युनिटला ‘डेसल प्राइज’ जाहीर केले.
जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन आणि सौर ऊर्जा विभागातील सर्व सहकाऱ्यांचे या पायाभूत व मौलीक संशोधनाच्या यशाबद्दल विशेष अभिनंदन केले. गेल्या तीन वर्षांत झालेल्या अथक प्रयत्नांना या पुरस्कारामुळे आम्हा सर्वाना प्रोत्साहन मिळाले आहे. हा पहिलाच टप्पा असून यापुढे असे प्रकल्प व्यावसायिक तत्वावर प्रत्येक ग्रामपंचायतीत सुरू करण्यासाठी अजून कालावधी जाईल. या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर शहरी व ग्रामीण भागासाठी व्हावा या दृष्टीने शासनातर्फेही प्रयत्नांची आवश्यकता महत्वाची राहील, असे भवरलाल जैन यांनी सांगितले.
या संशोधनाच्या पथकात जैन इरिगेशनच्या वतीने आर. बी जैन, अभिषेक निरखे, एमआयटी बोस्टनच्या वतीने संशोधक नताशा राईट, डॉ. प्रोफेसर एॅमोस विंटर यांचा समावेश होता.