अमेरिकी सिनेटने देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझव्‍‌र्हच्या प्रमुखपदी जॅनेट येलेन (६७) या महिला अर्थतज्ज्ञाच्या नेमणुकीस मंगळवारी मान्यता दिली. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या सर्वात शक्तिशाली मध्यवर्ती बँकेच्या प्रमुखपदी शंभर वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिलेची निवड होत आहे. त्यांच्या नेमणुकीवर अमेरिकी सिनेटमध्ये ५६ विरुद्ध २६ असे मतदान झाले.
फेडचे विद्यमान अध्यक्ष बेन बर्नान्के यांचा कार्यकाळ ३१ जानेवारीला संपुष्टात येत असून २०१० पासून उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या येलेन ताबडतोबीने पदग्रहण करतील. येलेन या देशातील सर्वात सन्माननीय अर्थतज्ज्ञ असून त्यांचा शपथविधी १ फेब्रुवारीला होईल, असे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले.    
फेडरल रिझव्‍‌र्हच्या अध्यक्षपदी जॅनेट येलेन यांची निवड झाल्याने आता आर्थिक उद्दिष्टे व आर्थिक धोरण निर्धारणाचा वापर रोजगारनिर्मिती, जीवनस्तर उंचावणे यासाठी केला जाईल. अमेरिकी कामगार व त्यांची कुटुंबे यांचा दर्जा उंचावण्याचाही त्या प्रयत्न करतील.
गेली तीन वर्षे फेडच्या उपाध्यक्षा म्हणून कार्यरत असताना येलेन यांनी अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले व देशाला पुन्हा आर्थिक वाढीच्या मार्गाने नेले, असे ओबामा यांनी सांगितले. आपला देश हा जगाच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे व ती भूमिका यापुढेही तशीच राहावी यासाठी येलेन यांची नियुक्ती महत्त्वाची आहे, असे डेमोक्रॅटिक नेत्या नॅन्सी पेलोसी यांनी सांगितले. शिस्त, निश्चय व अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या जाणकार, तज्ज्ञ या नात्याने त्या फेडला अत्युच्च पातळीवर नेतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
येलेन या बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या प्रोफेसर इमिरेट्स असून त्यांनी दहा वर्षे सॅन फ्रान्सिस्को फेडरल रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नर म्हणूनही काम केले आहे. बिल क्लिंटन यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्या त्यांच्या वरिष्ठ आर्थिक सल्लागार राहिल्या आहेत. आर्थिक समस्यांचा अनेकांगी वेध घेणारे लेखन येलेन यांनी विस्तृतपणे केले असले तरी प्रामुख्याने बेरोजगारीची कारणमीमांसा आणि परिणाम हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेने सावरत असल्याचे हलके संकेत दिले असले तरी रोजगारासंबंधीची आकडेवारी दिलासादायी नाही. येलेन यांच्या नियुक्तीला हाही एक पैलू निश्चितच आहे.
अमेरिकेचे अर्थमंत्री जॅकब ल्यू यांनी सांगितले की, येत्या काही वर्षांत येलेन या त्यांचा अर्थशास्त्रातील अनुभव पाहता जबाबदाऱ्या कणखरतेने पार पाडतील यात आमच्या मनात शंका नाही. त्या नुसत्या गुणवत्तेने श्रेष्ठ आहेत असे नाही तर त्यांची निर्णयक्षमताही उत्तम आहे. त्या स्वतंत्रशैलीने कामही करू शकतात ही त्यांची अनेक वैशिष्टय़े आहेत.