नागरी हवाई प्रवासी वाहतूक कंपनीत बँका भागीदार

कर्जाच्या वाढत्या भारापोटी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात अपयश आलेल्या जेट एअरवेजने अखेर कर्ज तिढा आराखडा तयार केला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने गुरुवारी मंजुरी दिलेल्या आराखडय़ानुसार आता जेट एअरवेजमध्ये बँकांची मालकी सर्वाधिक असेल.

८,५०० कोटी रुपये उभारणीसाठीही हा आराखडा उपयुक्त ठरणार आहे. या आराखडय़ानुसार, प्रत्येकी १० रुपये दर्शनीमुल्याचे ११.४० कोटी समभाग आता बँकांकडे असलेल्या कर्जामध्ये रुपांतरित होणार आहेत.

याबाबत कंपनीच्या संचालक मंडळाने गुरुवारी मंजूर केलेल्या प्रस्तावाला आता भागधारकांच्या परवानगीची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी भागधारकांची बैठक येत्या २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे. ३१ डिसेंबर २०१८ अखेर जेट एअरवेजमध्ये मुख्य प्रवर्तक नरेश गोयल हे सर्वाधिक ५१ टक्क्य़ांसह मोठे भागीदार आहेत. तर एतिहाद २४ टक्के राखून आहे. कंपनीवर ८,०५२ कोटी रुपयांचे कर्ज आहे. कंपनीने गेल्या तिमाहीत ५८७.७७ कोटी रुपयांचा तोटा सोसणारे वित्तीय निष्कर्ष गुरुवारीच जाहीर केले.

३१ कोटींच्या वसुलीसाठी आयडीबीआयची लिलाव प्रक्रिया

थकीत ३१ कोटी रुपये वसूल करण्यासाठी आयडीबीआय बँकेने मुंबईतील तयार वस्त्रप्रावरण निर्मात्यांच्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया पार पाडण्याचे निश्चित केले आहे. प्रदिप व नेहा हिरानी या दाम्पत्यांचा मुंबईतील वांद्रे येथील १२,२०० चौरस फूट जागेतील १० बेडरुमचा फ्लॅट लिलावात काढण्याची नोटीस आयडीबीआय बँकेने बजाविली आहे. ही प्रक्रिया २२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. याकरिता राखीव किंमत ३३.२३ कोटी रुपये आहे.