निधी उपलब्ध न झाल्यामुळे जेट एअरवेजनं आपली सेवा तात्पुरती बंद करण्याचे घोषित केल्यानंतर कंपनीच्या शेअरचा भाव सोमवारी सकाळी तब्बल 34 टक्क्यांनी घसरला व प्रति शेअर 158 रुपयांच्या पातळीपर्यंत घसरला. शेअर बाजारात नोंदणी झाल्यापासून जेटच्या शेअरची झालेली ही सर्वात मोठी पडझड आहे. त्यानंतर जेटच्या शेअर्सची थोडीफार खरेदी झाल्यामुळे भाव काहिसा वधारला व दुपारच्या सुमारास जेटच्या शेअरचा भाव मंगळवारच्या तुलनेत 27 टक्क्यांनी घसरत 175 रुपयांच्या पातळीवर आला. गेल्या एका वर्षात जेटच्या शेअरचा भाव प्रति शेअर 641 रुपयांवरून 158 इतका म्हणजे तब्बल 75 टक्क्यांनी घसरल्याचे बघायला मिळत आहे.

जेट एअरवेजच्या शेअरची नोंदणी शेअर बाजारात 14 मार्च 2005मध्ये झाली ज्यावेळी प्रति शेअर 1,100 रुपये किंमत होती. आज गुरूवारी जेटच्या शेअरची किमत घसरली त्याचवेळी प्रतिस्पर्धी असलेल्या स्पाइसजेटच्या शेअरची किंमत एका दिवसात 8.5 टक्क्यांनी वधारली आहे.
“भारतीय हवाई उद्योग क्षेत्रासाठी ही दुर्दैवी घटना आहे. या क्षेत्रातल्या खासगी कंपन्यांचा विचार केला तर जेट एअरवेज ही भारतातली या क्षेत्राचा पाया रचणारी कंपनी होती. उच्च दर्जाची सेवा व चांगले आगत-स्वागत यामुळे जेट प्रवाशांमध्येही लोकप्रिय होती. जेटची अधोगती किंगफिशर, डेक्कन व सहारा आदी विमानकंपन्यांच्या पतनाच्या पार्श्वभूमीवर बघायला हवी. एअर इंडिया ही सरकारी मालकिची कंपनी करदात्यांचे हजारो कोटी रुपये गुंतवून जिवंत ठेवण्यात आली आहे,” प्रभूदास लीलाधरचे सीईओ अजय बोडके यांनी सांगितले.

“नागरी उड्डाण क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांसाठी ही सावधगिरीची सूचना आहे. भारतीय विमानकंपन्यांसाठी नागरी उड्डाण वाहतूक क्षेत्र स्मशानभूमी का बनत आहे यावर विचार होण्याची गरज आहे. केवळ व्यवस्थापनाची अकार्यक्षमता याला कारणीभूत नसून वाजवी करधोरण लागू करण्यात आलेलं अपयशही कारणीभूत असल्याचं मत बोडके यांनी व्यक्त केल्याचं मिंट या वृत्तपत्रानं म्हटलं आहे.

याआधी जेटनं बँकांकडे 400 कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. परंतु गुंतवलेलं भांडवल नियमितपणे कसं परत मिळेल याबद्दल साशंकता असल्यानं बँकांनी कर्ज देण्याचं नाकारल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कंपनीकडे पैसेच नसल्यामुळे सेवा सुरू ठेवण्यासाठी साधं इंधन विकत घेणं वा अन्य अत्यावश्यक खर्च करणंही या विमानकंपनीला अशक्य झालं व सेवा तात्पुरती बंद करावी लागली. मे अखेरपर्यंत जेटमध्ये गुंतवणूक होण्याची अपेक्षा कंपनीनं व्यक्त केली असून जेटचं काय होतं हे एक कोडंच सध्यातरी सगळ्यांना पडलेलं आहे. जेटची 119 विमानं सध्या जमिनीवर असून सर्व विमानंसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये जेटच्या 250 वैमानिकांनी राजीनामे दिले असून मंगळवारी आणखी 25 जणांनी राजीनामे दिले आहेत. आता जेटकडे सुमारे 1,300 वैमानिक आहेत.