* दिवसाचे १० ते १२ तास सतत कार्यालयीन कामांत व्यस्त माझ्यासारख्यांसाठी सध्याच्या टाळेबंदीचा अनुभव फारसा सौख्यदायी नाही. नित्यक्रमानुसार, माझी सकाळ उजाडते ती दिवसभर करायच्या कामाच्या यादीने. माझे सहकारी, ज्यांना माझ्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा असते, प्रसंगी त्यांचे कनिष्ठ सहकारी अशा विविध कर्मचाऱ्यांशी दैनंदिन कामकाजासंबंधी चर्चा होत असते. हे सारे आमचे विस्तारित कुटुंबच आहे. या कुटुंबाचा प्रमुख या भूमिकेतून टाळेबंदीदरम्यान आमच्या सर्व कर्मचाऱ्यांशी तीन वेळा संवाद साधला. कंपनीतील कोणालाही केवळ लॉकडाऊन या कारणाने नोकरी गमवावी लागणार नाही यावरून सर्व कर्मचाऱ्यांना आश्वस्त केले. कंपनीचे एमडी असोत अथवा एमडींच्या गाडीचा चालक कसलाही भेद न राखता, विषाणू बाधा कोणालाही होऊ  शकते हे नव्याने कळले. सुदैवाने माझ्या परिचितांपैकी कोणाचाही करोना चाचणीचा निकाल सकारात्मक आलेला नाही. माझ्या कार्यालयाचा कारभार सांभाळणारा कर्मचारीवर्ग फोनवरून तत्परतेने सेवा देत असला तरी त्यांची अनुपस्थिती नक्कीच जाणवते. त्यांच्या सहकार्याशिवाय कंपनीचा गाडा हाकणे सोपे नाही.

या दिवसांत आमचे घर चालविण्यात आमच्या घरातील स्त्रियांना किती तत्पर असावे लागते हे नव्याने अनुभवास आले. कंपनीची आमच्या कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्यापासून आमच्या वितरकांपर्यंत एक स्थापित ‘सप्लाय चेन’ असते तशी आमच्या घरीसुद्धा एक सप्लाय चेन कार्यरत असते. आम्ही आमच्या ‘सप्लाय चेन’बद्दल खूप बोलतो, पत्नी मात्र तिच्या ‘सप्लाय चेन’बद्दल बोलत नाही. आज घरगुती मदतनीसांच्या अनुपस्थितीत घरातल्या लोकांवर किती ताण पडतो हे मला या काळाने शिकवले.

हे आमचे शताब्दी वर्ष आहे. मागील अनेक वर्षे आम्ही नफ्यात आहोत, या वर्षी नेमके काय होईल हे पुढे जाऊन कळेल. घरातील माणसे आणि कार्यालयातील कर्मचारी हे अमूल्य आहेत. आजच्या कठीण काळात माणसांची काळजी घ्या हेच मी सर्व संबिंधतांना सांगू इच्छितो.