रिझव्‍‌र्ह बँकेच्या अंतर्गत कार्यगटाने बडय़ा उद्योगांना खासगी बँका चालवू देण्याची केलेली शिफारस ही वित्तीय क्षेत्रात अराजक व अस्थिरतेला निमंत्रण ठरेल आणि कुडमुडय़ा भांडवलशाहीला चालना देईल, अशी टीका माजी मुख्य अर्थसल्लागार आणि जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ राहिलेले कौशिक बसू यांनी केले. वरकरणी चांगल्या भासणाऱ्या या पावलांची दिशा मात्र भरकटली आहे, असा शेराही त्यांनी लगावला.

जगातील सर्व यशस्वी अर्थव्यवस्थांमध्ये उद्योग आणि महामंडळे एका टोकाला तर बँका व कर्जदात्या संस्था दुसऱ्या टोकाला आणि दोहोंमध्ये स्पष्ट विभाजन रेषा राखली गेली आहे आणि त्यामागे ठोस कारणेही आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेच्या समितीचा प्रस्ताव हा वरकरणी चांगला भासू शकेल. एकीकडे उद्योगधंद्यांना वाढीसाठी कर्ज हवे आणि बँकांनाही पतपुरवठा वेगवान बनवून बँकिंग क्षेत्राचे जडत्व दूर करून सक्रियता हवी आहे. पण ही संलग्नता आणि संगनमतच धोक्याच्या दिशेने जाणारे आहे, असा इशारा बसू यांनी दिला.

संगनमतातून होणाऱ्या कर्ज वितरणाने (कनेक्टेड लेंडिंग) कुडमुडय़ा भांडवलशाहीला बळ दिले जाईल. विशिष्ट सरकारी मेहेरनजर असलेले बडे उद्योग हे व्यापार विश्व व्यापून टाकतील आणि छोटय़ा स्पर्धकांना परिघाबाहेर फेकतील, अशा शक्यतेकडे त्यांनी निर्देश केला.