रिलायन्स जिओनंतर केकेआर या कंपनीनं रिलायन्स रिटेलमध्ये ५ हजार ५०० कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय गेतला आहे. केकेआर ५ हजार ५०० कोटी रूपयांना रिलायन्स रिटेलमधील १.२८ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. यापूर्वी केकेआरनं रिलायन्स जिओमध्ये ११ हजार ३६७ कोटी रूपयांची गुंतवणूक केली होती. दरम्यान, केकेआरपूर्वी अमेरिकेतील प्रायव्हेट इक्विटी फर्म सिल्व्हर लेकनं रिलायन्स रिटेलमध्ये ७ हजार ५०० कोटी रूपयांची गुंतवणूक केली होती. सिल्व्हर लेकनं रिलायन्स रिटेलमधील १.७५ टक्के हिस्सा खरेदी केला होता. सिल्व्हर लेकच्या गुंतवणुकीनंतर लवकरच केकेआरही गुंतवणूक करेल अशा चर्चाही रंगल्या होत्या.

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीच्या रिलायन्स रिटेलमध्ये करण्यात आलेली ही दुसरी मोठी गुंतवणूक आहे. यामुळे रिलायन्स रिटेल अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टशी स्पर्धा करू शकेल. अमेरिकेतील केकेआरकडे ३० जून २०२० च्या आकडेवारीनुसार २२२ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. तर रिलायन्स रिटेलच्या आकडेवारीनुसार त्यांच्याकडे देशभरात १२ हजारांपेक्षा अधिक दुकानं असून वर्षाला ६४ कोटी लोकं खरेदीसाठी येत असतात. हा भारतातील सर्वात मोठा आणि विकसित होणारा व्यवसाय आहे.

“रिलायन्स रिटेलमध्ये केकेआरचं गुंतवणुकदार म्हणून स्वागत करण्यास आम्हाला आनंद होत आहे. अशाचप्रकारे आम्ही भारतातील रिटेल इकोसिस्टमच्या विकासासाठी आमची काम सुरू ठेवणार आहोत,” असं मुकेश अंबानी म्हणाले. “रिलायन्स रिटेल भारतातील ग्राहकांच्या आणि छोट्या व्यावसायिकांच्या सर्व गरजा पूर्ण करत आहे. देशातील जास्तीत जास्त ग्राहक ऑनलाइन व्यवहारांकडे वळत आहेत. आम्ही कंपनीच्या या अभियानाचा एक भाग बनून आनंदीत आहोत,” अशी प्रतिक्रिया केकेआरचे सह-संस्थापक आणि सह-मुख्य कार्यकारी अधिकारी हेनरी क्रेविस यांनी दिली.