एल अँड टी फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेडने दीनानाथ दुभाषी यांना कंपनीचे पूर्णवेळ संचालक म्हणून संचालक मंडळात सामावून घेतानाच, त्यांना सह-व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदोन्नती देत असल्याचे बुधवारी जाहीर केले. वित्तीय सेवा क्षेत्रात २५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले दुभाषी हे एल अँड टी फायनान्सचे मुख्य कार्यकारी म्हणून आजवर कार्यरत होते. त्यांच्या कारकीर्दीत एल अँड टी फायनान्सने किरकोळ कर्ज वितरणाचे धोरणात्मक वळण घेत एल अँड टी हाऊसिंग फायनान्स आणि फॅमिली क्रेडिट लि. अशी नवीन अंगे धारण केली. अल्पावधीत सुमारे ३० लाख लाभार्थी ग्राहक आणि एकूण मालमत्ता २८,००० कोटी रुपयांवर नेणारा कंपनीचा पसारा वाढविण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. दुभाषी यांनी यापूर्वी बीएनपी परिबा, केअर रेटिंग आणि एसबीआय कॅप या प्रतिष्ठित संस्थांमध्ये जबाबदारीची पदे सांभाळली आहेत.