साठच्या दशकात देशी औषधनिर्माण कंपनी स्थापन करून तिला अप्लावधीत एक आघाडीची जागतिक औषधनिर्मिती कंपनी म्हणून मान मिळवून देणाऱ्या ल्युपिन लिमिटेडचे संस्थापक व अध्यक्ष देशबंधू गुप्ता यांचे सोमवारी सकाळी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, चार मुली व एक मुलगा असा परिवार आहे.

१९६० मध्ये देशबंधू गुप्ता यांनी ल्युपिनची स्थापना केली. यानंतर अल्पावधीतच तिचे अस्तित्व १०० हून अधिक देशांमध्ये निर्माण झाले. गुप्ता यांनी रसायनशास्त्र विषयातून एम. एस्सी. केले होते.

राजस्थानमधील राजगढ येथील जन्म असलेल्या गुप्ता यांनी १९८८ ल्युपिन ह्य़ुमन वेलफेअर अ‍ॅण्ड रिसर्च फाऊंडेशनची स्थापना केली. ग्रामीण भारतातील शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी दारिद््यनिर्मूलन क्षेत्रात कार्य करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली.

याद्वारे देशभरातील ३,४६३ खेडय़ातील २८ लाख कुटुंबांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम ल्युपिनला घडविता आला. कमी किंमतीत अधिक गुणवत्ता असलेली औषधनिर्मितीवर गुप्ता यांचा भर असे. भारतीय औषधनिर्माण क्षेत्रातील आघाडीची कंपनी बनण्यासह ल्युपिन ही बाजार भांडवलांमध्ये जगातील चौथी मोठी कंपनी ठरली आहे.