सरलेले आर्थिक वर्ष २०१९ मध्ये देशभरात कंपनी व्यवहार मंत्रालयाकडे नोंदणीकृत १९ लाख कंपन्या लुप्त झाल्या आहेत. यापैकी ३६ टक्के म्हणजे ६.८ लाख कंपन्या या महाराष्ट्र आणि दिल्लीत स्थापित झालेल्या होत्या, अशी माहिती खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सोमवारी दिली.

आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या तुलनेत गाशा गुंडाळणाऱ्या कंपन्यांचे प्रमाण तब्बल २० टक्क्य़ांनी वाढले आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम २४८ (१) अन्वये सलगपणे दोन वर्षे वार्षिक लेखे आणि ताळेबंद सादर न करता, प्राप्तिकर विवरण पत्रही दाखल न करणाऱ्या कंपन्यांना ‘मृत कंपन्या’ अशा श्रेणीत वर्गवारी केली जाते. लुप्त होणाऱ्या कंपन्यांच्या संख्येतील मोठय़ा वाढीमागे हेच कारण असल्याचे मानले जात आहे.

महाराष्ट्रामध्ये १,४२,४२५ कंपन्यांनी आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये गाशा गुंडाळला असून, देशाच्या तुलनेत हे सर्वाधिक प्रमाण आहे. त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली हे राज्य असून, तेथे १,२५,९३७ कंपन्या नामशेष झाल्या आहेत. नोंदणीकृत कंपन्या मृतवत होण्याचे प्रमाण तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही मोठय़ा प्रमाणात दिसते. एकत्रित स्वरूपात या चार राज्यांचे एकूण बंद पडलेल्या कंपन्यांमध्ये निम्म्याहून अधिक प्रमाण आहे.

सुधारीत कंपनी कायद्याची अंमलबजावणी आणि नोंदणीकृत कंपन्यांच्या फेरवर्गीकरणानंतर, महाराष्ट्रातील बंद पडणाऱ्या कंपन्यांचे  प्रमाण ३८ टक्क्य़ांनी वाढले आहे. तथापि, कारभार थंडावलेल्या, आजारी, दिवाळखोरी अथवा अवसायानात आहेत अशा कंपन्यांची वेगळी वर्गवारी असून, त्यांचे प्रमाण ३ टक्क्य़ांच्या घरात जाणारे आहे.