पावसाळ्याच्या हंगामात वाहनांची मागणी घटल्याने येथील महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कारखान्याने १८ ते २२ जुलै असे सलग पाच दिवस बंद ठेवलेली उत्पादन प्रक्रिया मंगळवारपासून सुरू होत आहे. या महिन्यात पुन्हा पाच दिवस कारखाना बंद राहणार नसल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
जागतिक मंदीमुळे सध्या अनेक उद्योग मंदीच्या सावटाखाली सापडले आहेत. वाहन उद्योगही त्यास अपवाद नाही. वाहन उद्योगात महिंद्रा आणि महिंद्रा ही आघाडीवरील कंपनी सध्या त्याच सावटाखाली सापडल्याचे सांगितले जाते.
पावसाळ्याच्या हंगामात वाहनांच्या मागणीत घट होत असल्याने व्यवस्थापनाने १८ ते २२ जुलै या कालावधीत उत्पादन प्रक्रिया बंद ठेवली होती. त्यातील शनिवार हा एक दिवस सुटीचा होता. पुन्हा पाच दिवस कारखाना बंद राहणार असल्याची चर्चा सुरू असली तरी ती निराधार असल्याचे महाव्यवस्थापक (कर्मचारी संबंध) ए, के. गोडबोले यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
मंगळवारपासून उत्पादन प्रक्रिया पूर्ववत होत असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील दीड महिने मागणीची पूर्तता होईल, इतके उत्पादन सध्या कारखान्यात पडून आहे. त्यात कारखान्याची कोटय़वधींची गुंतवणूक झाली आहे. यामुळे कारखान्याने उत्पादन प्रक्रिया थांबविण्याचा निर्णय घेतला होता. नाशिकच्या औद्योगिक वर्तुळात महिंद्रा आणि महिंद्रा हा प्रमुख कारखाना आहे. या कारखान्यात सुमारे अडीच हजार कायमस्वरूपी तर जवळपास तितकेच हंगामी कामगार आहेत. तसेच ४५० छोटे-मोठे लघु उद्योजक या उद्योगावर आधारीत आहेत. लघुउद्योगांमधील हजारो कामगारांची भिस्त या एकाच कारखान्यावर आहे. बंद राहण्याच्या कालावधीतील वेतन महिंद्रातील कामगारांना मिळणार असले तरी लघु उद्योगातील हजारो कामगारांना तसा दिलासा मिळणार नाही. कारखाना बंद राहिल्याने त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. परंतु, मंगळवारपासून कारखान्यातील उत्पादन नेहमीप्रमाणे सुरू होत असल्याचे गोडबोले यांनी सांगितले.