26 September 2020

News Flash

गुंतवणुकीची कास सोडू नका!

कोणत्या गुंतवणूक पर्यायात किती पैसा घालावा याची विभागणी नीट केली गेली पाहिजे.

निमेश शहा

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक निमेश शहा यांनी सध्याच्या बाजार अस्थिरतेच्या स्थितीत गुंतवणूकदारांना दिलेले कानमंत्र.

देशांतर्गत आणि जागतिक घटनाक्रमांच्या परिणामी भारताच्या भांडवली बाजारातील अलिकडील तीव्र चढ-उतार आपण अनुभवत आहोत. त्या आधी दोन वर्षे बाजार निरंतर तेजीचा होता. या दोन वर्षांत समभागांत पहिल्यांदाच पैसा गुंतविणारेही निश्चितच मोठय़ा संख्येने आहेत, त्या मंडळींना सद्य बाजार स्थिती भीती निर्माण करणारी नक्कीच आहे. तथापि चालू संपूर्ण वर्ष हे समभाग बाजारासाठी अस्थिरतेचेच राहील. या स्थितीत गुंतवणुकीची काही मूलभूत तत्त्वे ध्यानात घेतली गेली पाहिजेत.

पैशाची सुयोग्य विभागणी

गुंतवणूकयोग्य पैशाचे विभाजन ज्याला ‘अ‍ॅसेट अलोकेशन’ म्हणतात ते दीर्घावधीत गुंतवणुकीतून चांगली संपत्ती निर्माणाचे पहिले तत्त्व आहे. कोणत्या गुंतवणूक पर्यायात किती पैसा घालावा याची विभागणी नीट केली गेली पाहिजे. गुंतवणूकदार आपल्या खास हिशेबाने विशिष्ट गुंतवणूक वर्गात अधिकाधिक पैसा गुंतवीत असतात. हे विशेषत: आजच्यासारख्या अस्थिर बाजार स्थितीत बरोबर ठरणार नाही. अ‍ॅसेट अलोकेशन अर्थात पैशाची विभागणी ही गुंतवणुकीतील जोखीम सोसण्याच्या आपल्या क्षमतेवर अवलंबून असावी. किंबहुना त्यातून जोखीम जास्तीत जास्त सुसह्य़ बनेल असा प्रयत्न असावा. अर्थातच प्रत्येकाची जोखीम सोसण्याची क्षमता वेगवेगळी असते, हेही लक्षात असू द्यावे. त्यामुळे चांगल्या वित्तीय सल्लागाराची भेट घेऊन, तुमच्या पैशाची योग्य गुंतवणूक पर्यायात विभागणी कशी केली जाईल हे त्यांच्या सल्ल्याने निश्चित करून, त्याची अंमलबजावणी आणि पाठपुरावा करावा.

गुंतवणुकीचे संतुलन

बाजार अनिश्चिततेने भारलेला असेल तेव्हा गुंतवणुकीचा संतुलित मार्ग आवश्यक ठरतो. बॅलेन्स अ‍ॅडव्हान्टेज वर्गवारीतील योजनांची निवड मग अशा समयी उपयुक्त ठरते. या अशा म्युच्युअल फंड योजना आहेत, ज्यातून समभाग (इक्विटी) आणि रोखेसंलग्न (डेट) या दोन्ही मालमत्ता वर्गात संतुलन साधले जाते. या म्युच्युअल फंड योजनांचे निधी व्यवस्थापक त्या त्या वेळचे बाजार मूल्यांकन पाहून समभाग आणि रोख्यांमध्ये गुंतवणुकीची विभागणी तुमच्या वतीने करीत असतो. जेव्हा शेअर बाजार घसरणीला असतो तेव्हा समभागांमध्ये अधिक गुंतवणूक आणि बाजार तेजीत असताना ती विकून नफावसुलीचा पवित्रा घेतला जातो. बाजार घसरणीत रोख्यांमध्ये असलेल्या गुंतवणुकीने तुमच्या गुंतवणूक भांडाराला मोठय़ा नुकसानीपासून वाचविले जाते.

लार्ज कॅपवर भर

जे गुंतवणूकदार समभागांमध्ये गुंतवणूक करू इच्छितात, त्यांनी सद्य काळात बाजार अग्रणी अर्थात लार्ज कॅप समभागांची निवड करण्याचाच आम्ही सल्ला देऊ. चालू वर्षांत आजतागायत बाजारात १० टक्कय़ांच्या आसपास घसरण झाली आहे, तरी मिड आणि स्मॉल कॅप समभागांचे मूल्यांकन आजही महागडेच आहे. त्या उलट या घसरणीत लार्ज कॅप समभागाचे मूल्य वाजवी स्तरावर आले आहे. आणखी एक गोष्ट ध्यानात ठेवायला हवी की, ऐतिहासिकदृष्टय़ा पाहिल्यास बाजारात तेजीच्या स्थितीत लार्ज कॅप समभागांची कामगिरी नेहमीच सर्वोत्तम राहिली आहे.

डेट फंडांचा समावेश

गेल्या दोन-अडीच वर्षांत गुंतवणूकदारांना समभागसंलग्न अर्थात इक्विटी फंडांनी दमदार परतावा दिला आहे. अगदी अल्पावधीसाठी गुंतवणूकही फायद्याची ठरली आहे. रोखेसंलग्न अर्थात डेट फंडातील कैक वर्षांच्या गुंतवणुकीने जितका परतावा दिला, तितकाच परतावा इक्विटी फंडातील केवळ वर्षभराच्या गुंतवणुकीने मिळवून दिला. यातून डेट फंडातील गुंतवणुकीच्या सार्थतेबाबत सवाल उभे करणारेही काही जण पुढे आले आहेत. तरी रोखे हा आजही एक महत्त्वाचा मालमत्ता वर्ग आहे आणि प्रत्येकाच्या गुंतवणूक भांडाराचा तो एक आवश्यक घटक आहे. जे लोक नव्याने गुंतवणूक सुरू करू इच्छित आहेत, त्यांनी अक्रुअल फंड अथवा डय़ुरेशन फंडापासून सुरुवात करावी.

गुंतवणुकीत सातत्य ठेवा

बाजारातील चढ-उतार हे धडकी भरवतात आणि मन विचलित करतात हे मान्य. परंतु त्यातून काही वर्षे निगुतीने सुरू असलेली नियोजनबद्ध गुंतवणूक (एसआयपी) अकस्मात बंद करण्याचा निर्णय काही जण घेताना दिसतात. ही गुंतवणूक सुरू करताना ती दीर्घावधीसाठी विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सुरू केली होती, याचा त्यांना विसर पडतो. अल्पावधीच्या अस्थिरतेतून दीर्घावधीच्या तपश्चर्येचा भंग होणे हे चांगले लक्षण नाही. त्यामुळे बाजारातील तात्पुरत्या चढ-उतारांचा आपल्या ‘एसआयपी’ गुंतवणुकीवर परिणाम होऊ देऊ नका, गुंतवणूक कोणत्याही स्थितीत सुरूच ठेवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 1:26 am

Web Title: market situation investment icici prudential amc md nimesh shah
Next Stories
1 बाजारपेठेत विस्ताराने व्यवसायवाढीच्या अधिक संधी
2 ICICI बँकेच्या बोर्डामध्ये मतभेद! चंदा कोचर यांना पदाचा राजीमामा द्यावा लागणार ?
3 ‘सहज’ बनले आणखी अवघड
Just Now!
X