सुधीर जोशी

गेल्या दीड महिन्यात चौखूर उधळलेल्या बाजाराने या सप्ताहात विश्रांती घेतली. परंतु रिलायन्सनंतर माहिती तंत्रज्ञान व औषध क्षेत्रातील कंपन्यांनी बाजारामधील उत्साह कायम ठेवला. बाजार नकारात्मक गोष्टी गृहीत धरून कुठल्याही चांगल्या बातमीचे स्वागत करीत आहे. या सप्ताहात सेन्सेक्स व निफ्टीमध्ये अनुक्रमे ५२२ व १२१ अंकांची घट झाली तरी बाजार एक पाऊल मागे घेऊन पुढील मोठय़ा झेपसाठीची तयारी करत आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या तिमाही नफ्यात ३६ टक्के  वाढ झाली. कोविडचा कर्ज वितरणावर परिणाम झाला तरी बँकेला आपल्या उप कंपन्यांमधील भांडवली हिस्सा विकल्यामुळे नफ्याचे प्रमाण वाढवता आले. कंपनीच्या कर्जांचे परतफेड स्थगितीमधील प्रमाण व बुडित कर्जांचे प्रमाण कमी झाले आहे. मुदतीच्या ठेवी व बचत खात्यांमधील रकमेत वाढ झाली आहे तसेच पर्याप्त भांडवलाचे प्रमाणही पुरेसे आहे. त्यामुळे दीर्घ मुदतीसाठी खासगी बँकांमध्ये या बँकेतील गुंतवणूक फायद्याची असेल. आयटीसीच्या सर्वात जास्त नफा मिळविणाऱ्या सिगारेट व्यवसायावर टाळेबंदीचा परिणाम झाला. परंतु आता सर्व कारखाने पूर्णपणे सुरू झाले आहेत. विमान वाहतूक पूर्ववत होईपर्यंत आयात सिगारेटचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कंपनीच्या हा व्यवसाय चांगला नफा मिळवू लागेल. तयार आटा, खाद्य पदार्थाच्या व्यवसायाने टाळेबंदीमध्ये चांगला जोर पकडला आहे. कंपनी त्याचा कसा फायदा करून घेते हे पुढील सहा महिन्यांत दिसेल. कंपनीचे उदार लाभांश धोरण लक्षात घेऊन प्रत्येक मोठय़ा घसरणीमध्ये हे समभाग जमवणे फायद्याचे राहील. याआधी सांगितल्याप्रमाणे मारुती सुझुकी या भारतातील सर्वात मोठय़ा वाहन कंपनीला ग्रामीण भागातील सुबत्ता व सद्य:स्थितीत स्वत:चे वाहन असण्याकडे खरेदीदारांचा वाढता कल याचा फायदा होईल. कंपनीला १७ वर्षांत प्रथम तिमाही तोटा झाला तरी कंपनीचे बाजारमूल्य आठवडय़ात वाढले. ऑगस्टपासून ३ वर्षांंच्या वाहन विम्याचे बंधन दूर करण्याचा विमा नियामक मंडळाचा निर्णयही कंपनीच्या पथ्यावर पडेल. सध्याच्या बाजारभावात घसरण झाली की यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळेल.

अपवादात्मक उत्पन्न वगळले तर रिलायन्सचा तिमाही नफा ४० टक्क्यांनी घसरला आहे. परंतु कंपनीची नवीन कार्यक्षेत्रे व कर्जमुक्त ताळेबंदामुळे कंपनीचे बाजारातील आकर्षण कमी होणार नाही. एचडीएफसी लिमिटेडच्या तिमाही नफ्यात केवळ पाच टक्यांची घट झाली. जरी कोविडमुळे घरखरेदीवर परिणाम होणार असला तरी या क्षेत्रातील ही कंपनी गुंतवणुकीसाठी फायद्याची आहे.

sudhirjoshi23@gmail.com