स्वत:चीच एसएक्स४ गुंडाळत स्पर्धक सिटी, व्हर्नाला टक्कर देऊ पाहणारी मारुती सुझुकीची बहुप्रतिक्षित नवी सिआझ अखेर सादर झाली. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या कंपनीच्या मध्यम सेदान श्रेणीतील या कारचे सोमवारी देशभरात एकाचवेळी सादरीकरण करण्यात आले.
पेट्रोल आणि डिझेल तसेच गिअर आणि अ‍ॅटोमॅटिक प्रकारातील या कारची किंमत ६.९९ ते ९.८० लाख रुपये (एक्स शोरुम – नवी दिल्ली) निश्चित करण्यात आली आहे. १.४ लिटरचे पेट्रोल आणि १.३ लिटरचे डिझेल इंजिन यात बसविण्यात आले आहे.
सिआझ या नव्या कारबरोबर यावेळी मारुती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी केनिची अयुकावा हे उपस्थित होते. नव्या कारची मध्य पूर्व, लॅटिन अमेरिका, आफ्रिका आदी भागांमध्येही निर्यात करण्यात येणार आहे.
सिआझची निर्मिती नव्या व्यासपीठावर करण्यात आली असून त्यातील ९८ टक्के सुटे भाग हे स्थानिक पातळीवर तयार करण्यात आले आहेत. या एका प्रकारच्या कारनिर्मितीसाठी कंपनीने ६२० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
सिआझची नोंदणी यापूर्वीच सुरू झाली असून कंपनीने आतापर्यंत १० हजार कारसाठी उत्सुकता नोंदविली आहे. कंपनीच्या एसएक्स४ची महिन्याला ३ हजार वाहनांची विक्री प्रत्यक्षात होत असे.
होन्डाची सिटी आणि ह्य़ुंदाईची व्हर्ना या मध्यम सेदान श्रेणीतील ७.१९ ते ११.७२ लाख रुपये किंमत असणाऱ्या वाहनांशी नवी सिआझ स्पर्धा करणार आहे. यासाठी मारुतीने तिची एसएक्स४ ही याच श्रेणीतील कारचे उत्पादन बंद केले आहे.
नव्या रुपात सादर केलेल्या होन्डाच्या सिटीने गेल्या महिन्यात ५ हजार वाहने विकली. तर मध्यम सेदान श्रेणीची भारतीय बाजारपेठ ही महिन्याला १६ हजार विक्रींची आहे. सिआझने पहिल्या वर्षांत ६० हजार ते ८० हजार वाहन विक्रीचे उद्दिष्ट राखल्याचे अयुकावा यांनी सांगितले. तीन वर्षांच्या मंदीनंतर भारतीय वाहन बाजारपेठेत उत्साह निर्माण झाल्याचेही ते म्हणाले. कंपनीच्या सेदान श्रेणीतील स्विफ्ट डिझायरीच निर्मिती कायम असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कंपनीने गेल्या महिन्यात १४.७ टक्के कार विक्री नोंदविली आहे.