‘मारुती’ला १७.२० टक्के घसरणीचा धक्का

नवी दिल्ली : नव्या वित्त वर्षांपासून महाग करण्यात आलेल्या वाहनांच्या किमतीचा फटका उद्योगाला बसला असून मारुती सुझुकीसारख्या अनेक कंपन्यांच्या वाहन विक्रीत वर्षांच्या पहिल्याच महिन्यात दुहेरी अंकापर्यंतची घसरण नोंदली गेली आहे.

गेल्या, २०१८-१९ या आर्थिक वर्षांत भारतातील प्रवासी वाहनांची विक्री अवघ्या २.७० टक्क्यांनी वाढली होती.

चालू, २०१९-२० वित्त वर्षांच्या सुरुवातीपासूनच अनेक कंपन्यांनी विविध गटातील वाहनांच्या किमतीत १० टक्क्यांपर्यंतची वाढ लागू केली. त्याचा विपरीत परिणाम अनेक कंपन्यांच्या वाहन विक्रीवर झाल्याचे बुधवारी जाहीर झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

वाहन विक्रीत देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या व या क्षेत्रात निम्मी बाजारपेठ राखून असलेल्या मारुती सुझुकीच्या एकूण विक्रीत एप्रिल २०१९ मध्ये १७.२० टक्के घसरण होऊन गेल्या महिन्यातील वाहन विक्री १.४३ लाख झाली आहे. कंपनीने वर्षभरापूर्वी याच कालावधीत १.७२ लाख वाहने विकली होती. मारुतीची वाहनेही एप्रिलपासून काही प्रमाणात महाग झाली आहेत.

कंपनीची देशांतर्गत वाहन विक्रीदेखील रोडावत (-१८.७० टक्के) १.३४ लाख झाली आहे. एप्रिल २०१८ मध्ये ती १.६४ लाख होती. एप्रिलमध्ये मारुतीची निर्यात १४.६० टक्क्यांनी वाढून ९,१७७ झाली आहे. वर्षभरापूर्वी याच दरम्यान ती ८,००८ होती.

मारुती सुझुकीची सर्वाधिक विकली जाणारी अल्टो यंदा तब्बल ३९.८० टक्क्यांनी घसरत २२,७६६ वर येऊन ठेपली आहे. तर स्विफ्ट, सेलेरिओ, इग्निस, बलोनोसारखी कॉम्पॅक्ट गटातील वाहनांची विक्री १३.९० टक्क्यांनी कमी होत ७२,१४६ झाली आहे. कंपनीच्या मध्यम गटातील सेदान श्रेणीतील सिआझची विक्री निम्म्म्याहून काहीशी अधिक झाली आहे. व्हिटारा ब्रेझा, एस-क्रॉस, एर्टिगा वाहनांची विक्री तुलनेत कमी, ५.९ टक्क्यांनी कमी होत ती २२,०३५ झाली आहे.

कृषी उपकरण निर्मितीतील आघाडीच्या एस्कॉर्ट्सने गेल्या महिन्यात १४.९० टक्के घसरण नोंदविताना ५,२६४ ट्रॅक्टरची विक्री केली आहे. एप्रिल २०१८ मध्ये कंपनीच्या ट्रॅक्टरची विक्री ६,१८६ नोंदली गेली होती. तर देशांतर्गत गेल्या महिन्यात देशांतर्गत वाहन विक्री १८.२ टक्क्यांनी कमी होत ४,९८६ झाली आहे. कंपनीची निर्यात या दरम्यान २७८ ट्रॅक्टरची राहिली आहे.

मारुतीची कट्टर स्पर्धक असलेल्या होंडा कार्स इंडिया लिमिटेडने एप्रिलमध्ये दमदार कामगिरी बजाविताना २३ टक्के वाढीसह ११,२७२ वाहनांची विक्री केली आहे. कंपनीने नव्या वित्त वर्षांच्या सुरुवातीलाच काही नवीन वाहने सादर केल्याने त्याचा यंदाच्या विक्रीवर परिणाम झाला नाही, असा दावा कंपनीच्या विक्री व विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश गोयल यांनी म्हटले आहे.

दुचाकी वाहन गटात जपानच्या सुझुकी मोटरसायकल इंडियाने १२.५७ टक्के वाढीसह एप्रिलमध्ये ६५,९४२ वाहने विकली. तर कंपनीची देशांतर्गत वाहन विक्री ९.२५ टक्क्यांनी वाढून ५७,०७२ झाली आहे. चालू एकूण वित्त वर्षांकरिता कंपनीचे १० लाख दुचाकी विक्रीचे लक्ष्य यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.

विजेवरील वाहनांच्या विक्री संख्येत वाढ

विजेवर धावणाऱ्या वाहनांची विक्री गेल्या एकूण आर्थिक वर्षांत ७.५० लाखांच्या वर पोहोचली आहे. २०१८-१९ मध्ये देशातील एकूण विजेवरील वाहनांची विक्री ७,५९,६०० झाली आहे. यामध्ये १.२६ लाख दुचाकी, ६.३० लाख तीन चाकी तर ३,६०० प्रवासी वाहनांचा समावेश आहे. विजेवरील वाहने वापरण्याबाबत वाढता प्रसार व तिच्या खरेदीसाठी असलेले अनुदान प्रोत्साहनामुळे यंदा ही श्रेणी सकारात्मक राहिल्याचे ‘सोसायटी ऑफ म ॅन्युफॅक्चर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स’चे महासंचालक सोहिंदर सिंग गिल यांनी म्हटले आहे.