नवी दिल्ली : आघाडीची वाहन उत्पादक मारुती सुझुकी लिमिटेडने डिझेल इंधनावर चालणाऱ्या कारचे उत्पादन एप्रिल २०२० पासून संपूर्णपणे बंद करण्याच्या निर्णयाची गुरुवारी घोषणा केली. एप्रिल २०२० पासून प्रदूषणविषयक ‘बीएस-६’ नियमावली लागू होत असून, कंपनीच्या या निर्णयामागे हेच प्रमुख कारण आहे.

कंपनीच्या चौथ्या तिमाही कामगिरीच्या घोषणेप्रसंगी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी स्पष्ट केले की, पुढील वर्षी एप्रिलपासून कंपनी डिझेल वाहनांचे उत्पादन पूर्णपणे थांबवेल. नवीन प्रदूषणविषयक कठोर नियमावलीचे पालन करायचे झाल्यास डिझेल वाहनाचा उत्पादन खर्च लक्षणीय वाढेल आणि ग्राहकांसाठी हा व्यवहार्य पर्याय ठरणार नाही, अशी या निर्णयामागील कारणमीमांसाही त्यांनी केली.

प्रवासी वाहनविक्रीत देशात अव्वल असलेल्या मारुती सुझुकीची एस-क्रॉस, सिआझ, व्हिटारा ब्रेझा, डिझायर, बलेनो आणि स्विफ्ट ही वाहने डिझेल इंधन प्रकारातही आहेत. पेट्रोलच्या तुलनेत यांचे डिझेल मॉडेल तुलनेने महाग असले तरी, इंधन किमती परवडत असल्याने डिझेल कारला खरेदीदारांची पसंती असते.

मारुती सुझुकीचा देशांतर्गत प्रवासी वाहन बाजारपेठेत ५१ टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे आणि डिझेल कारच्या विक्रीचा कंपनीच्या वार्षिक महसुलात २३ टक्के हिस्सा आहे. आगामी काळात डिझेल कारचे उत्पादन बंद केल्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी कंपनी सीएनजी आणि हायब्रिड तंत्रज्ञानावर आधारित वाहने विकसित करेल, असे भार्गव यांनी सांगितले.

सरलेल्या जानेवारी-मार्च २०१९ तिमाहीत कंपनी १,७९५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला, जो मागील वर्षांतील याच तिमाहीतील नफ्याच्या तुलनेत ४.६ टक्के घसरला आहे.

तिमाहीतील विक्रीही ०.४ टक्के घटून ४,२८,८६३ वाहने इतकी आहे, तर विक्री महसूल ०.७ टक्के घसरून २०,७३७.५ कोटी रुपये नोंदविला गेला आहे.