सप्टेंबरमध्ये कंपनीची सात वाहने पहिल्या दहांमध्ये

नवी दिल्ली : देशातील प्रवासी वाहन गटामध्ये मारुती सुझुकीचे अव्वल स्थान यंदाही कायम राहिले आहे. सप्टेंबरमध्ये पहिल्या दहा वाहनांमध्ये कंपनीची तब्बल सात वाहने राहिली आहेत.

‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स’ (सिआम)ने जाहीर केलेल्या देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांमध्ये मारुती सुझुकीची सात विविध प्रकारची वाहने पहिल्या दहामध्ये नोंदली गेली आहेत.

दहापैकी उर्वरित तीन स्थानावर मारुतीची कट्टर स्पर्धक कोरियन बनावटीच्या ह्य़ुंदाई मोटर इंडियाची वाहने राहिली आहेत.

मारुतीची हॅचबॅक गटातील स्विफ्ट २२,२२८ विक्रीसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर सर्वात कमी किंमत गटातील अल्टो दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र कंपनीची विक्री या महिन्यात वार्षिक तुलनेत काहीशी घसरली आहे. सेदान श्रेणीतील स्विफ्ट डिझायर तिसऱ्या स्थानी तर महागडय़ा हॅचबॅक गटातील बलेनो चौथ्या स्थानी राहिली आहे. नवागत व्हिटारा ब्रेझा ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही १४,४२५ वाहनांसह पाचव्या स्थानावर आहे. प्रवासी गटातील व्हॅगन आर सहाव्या स्थानावर असून गेल्या महिन्यात त्यांची विक्री १३,२५२ झाली आहे.

ह्य़ुंदाई मोटर इंडियाची हॅचबॅक श्रेणीतील एलाईट आय२० १२,३८० वाहनांसह पहिल्या दहामध्ये सातव्या स्थानावर आहे, तर याच कंपनीच्या ग्रॅण्ड आय१० व क्रेटा या अनुक्रमे आठव्या व नवव्या स्थानावर राहिल्या आहेत. त्यांची विक्री यंदाच्या सप्टेंबरमध्ये अनुक्रमे ११,२२४ व ११,००० अशी झाली आहे. शेवटच्या स्थानावर मारुतीची सेलेरिओ हे हॅचबॅक श्रेणीतील वाहन १० हजारांपेक्षाही कमी विक्रीसह राहिले आहे.