रिझव्‍‌र्ह बँकेतील रिक्त डेप्युटी गव्हर्नरपदाच्या जागेवर मायकेल देबब्रत पात्रा यांच्या नियुक्तीची घोषणा मंगळवारी केंद्रातील कार्मिक मंत्रालयाकडून करण्यात आली. त्यांची नियुक्ती तीन वर्षे कालावधीसाठी आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेवर जास्तीत जास्त चार डेप्युटी गव्हर्नरांची नियुक्ती केली जाऊ शकते. सध्या गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या सोबतीला एन. एस. विश्वनाथन, बी. पी. कानुंगो आणि एम. के. जैन असे तीन डेप्युटी गव्हर्नर आहेत. चौथ्या रिक्त जागेवर रिझव्‍‌र्ह बँकेचे विद्यमान कार्यकारी संचालक या नात्याने मुद्राविषयक धोरण विभागाची जबाबदारी आजवर पाहात आलेल्या मायकेल पात्रा यांची नेमणूक झाली आहे.

गेल्या वर्षी जूनमध्ये डॉ. विरल आचार्य यांनी मुदतपूर्व राजीनामा दिल्याने मध्यवर्ती बँकेतील चौथ्या डेप्युटी गव्हर्नरपदाची जागा रिक्त होती. डॉ. आचार्य यांच्याकडेही मुद्राविषयक धोरणाची जबाबदारी होती, तीच जबाबदारी त्यांच्या जागी आलेले पात्रा वाहतील, अशी अपेक्षा आहे.