मुंबई : सध्या शिखर स्थानावर पोहोचलेले भांडवली बाजार निर्देशांक, बाजारातील नवीन संक्रमणालाही अधोरेखित करीत आहे. येणारा काळ हा याच बाजार वर्गाचा राहणार असल्याचा हा संकेत असल्याने मल्टीकॅप धाटणीचे म्युच्युअल फंड या बदललेल्या प्रवाहाचे प्रामुख्याने लाभार्थी ठरणार आहेत.

मागील जवळपास दोन वर्षे अडगडीत फेकले गेलेल्या स्मॉल आणि मिड कॅप समभागांपैकी निवडकांची सध्या लक्षणीय स्वरूपात खरेदी सुरू झाली आहे. मिड आणि स्मॉल कॅप फंडांच्या तुलनेत कमी जोखीम असलेल्या मल्टी कॅप फंडात गुंतवणुकीसाठी म्हणूनच सध्याची वेळ उत्तम असल्याचे मानले जाते. दीर्घावधीत या फंडांनी खूपच चांगला परतावा दिला असल्याचे अर्थलाभ डॉट कॉमकडून संकलित आकडेवारी सांगते. जसे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टिकॅप फंडाने ‘एसआयपी’ धाटणीच्या गुंतवणुकीवर सात वर्षांत १२.१ टक्के, १० वर्षांत १२.५ टक्के, १५ वर्षांत १२.९ टक्के अशा उमद्या दराने वार्षिक परतावा दिला आहे. म्हणजे या फंडात दरमहा १० हजार रुपयांची एसआयपी सात, १० आणि १५ वर्षे केली गेली असल्यास, नोव्हेंबर २०१९ अखेर त्याचे मूल्य अनुक्रमे १२.९ लाख रुपये, २३ लाख रुपये आणि ५१.६ लाख रुपये झाले असते.