सार्वजनिक कंपन्यांच्या निर्गुतवणुकीच्या निर्णयावर गुरुवारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब होण्याची वेळ येऊन ठेपली असतानाच इंडियन ऑइलमधील (आयओसी) सरकारी हिस्सा विक्री विद्यमान मूल्यानुसार करण्यास पेट्रोलियम मंत्रालयाने विरोध दर्शविला आहे.
आयओसीमधील १० टक्के हिस्सा विक्रीची सरकारची योजना आहे. मात्र कंपनीचे समभाग मूल्य सध्या खूपच रोडावले आहे. १८ जानेवारीच्या ३७५ रुपये या वर्षांतील उच्चांकापासून कंपनीचे समभाग मूल्य आता फार दूर असल्याने (बुधवारचा भाव १९५.५० रुपये) या दराने भागविक्री प्रक्रियेस खात्याचे केंद्रीय मंत्री वीराप्पा मोइली यांनी विरोध दर्शविल्याचे मानले जाते.
निर्गुतवणुकीच्या चर्चेने सरकारी तेल कंपन्यांमध्ये तेजी
ल्ल निर्गुतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काही कंपन्यांची भागविक्री प्रक्रिया त्वरित राबविण्याच्या केंद्र सरकारच्या मंगळवारच्या संकेताने बुधवारी बाजारात या क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग मूल्य उंचावले. यामध्ये तेल व वायू क्षेत्रातील कंपन्यांचाही समावेश राहिला.
आरोग्यनिगा निर्देशांक पाठोपाठ सार्वजनिक उपक्रम निर्देशांक ०.८२ टक्क्यापर्यंत वाढ नोंदवीत होता. सेन्सेक्समध्ये आघाडीवर राहिलेला कोल इंडिया दिवसभरात ५.२२ टक्क्यांपर्यंत उंचावला. कोल इंडियाची निर्गुतवणूक प्रक्रिया अयशस्वी ठरल्यास विशेष लाभांश मिळण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांनी दिवसअखेर या समभागाला २८८.७५ रुपयांचे मूल्य प्राप्त करून दिले.