वाढीव मुदत अखेर पथ्यावर

नवी दिल्ली : तीन वेळा मुदतवाढ मिळालेला प्राप्तिकर विवरणपत्र भरणा यंदा ५ टक्क्यांनी वाढला आहे. वित्त वर्ष २०१९-२० साठी ५.९५ कोटी करदात्यांनी अखेरच्या दिवसापर्यंत प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केले आहे.

कर निर्धारण वर्ष २०२०-२१ साठीची व्यक्तिगत करदात्यांसाठी विवरणपत्र दाखल करण्याची मुदत १० जानेवारी २०२० होती. कोविड व टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर तिला तत्पूर्वी तीन वेळा मुदतवाढ मिळाली होती. तर आस्थापनांसाठीची मुदत येत्या १५ फेब्रुवारीला संपत आहे.

गेल्या वर्षी विवरणपत्र भरणा मुदत ३१ जुलै, ३१ डिसेंबर व यंदाच्या १० जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली होती. यापूर्वीच्या वित्त वर्षांसाठीची विस्तारित मुदत १० सप्टेंबर २०१९ होती. तेव्हा अखेरच्या दिवसापर्यंत ५.६७ कोटी विवरणपत्र दाखल झाले होते. आयटीआर-१ भरणाऱ्यांची (निवासी व्यक्तिगत करदात्याते) संख्या मात्र यंदा रोडावली असून ती ुवर्षभरापूर्वीच्या ३.११ कोटींच्या तुलनेत २.९९ कोटी आहे. वार्षिक ५० लाख रुपयेपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांमार्फत हे विवरणपत्र दाखल करण्यात येते.

मुदतवाढ नाहीच!

प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची आस्थापनांसाठी असलेली १५ फेब्रुवारीची मुदत वाढविण्यात येणार नाही, असे केंद्रीय अर्थ खात्याने मंगळवारी स्पष्ट केले. व्यक्तिगत करदात्यांसाठीची, रविवारी संपलेली मुदतही वाढविण्यास सरकारने नकार दिला होता. अखिल भारतीय गुजरात कर सल्लागार संघटनेने याबाबत गुजरात उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेला उत्तर देताना सरकारने हे स्पष्टीकरण दिले आहे. यापूर्वीच्या मुदतवाढीची कल्पना अर्थ विभागाने महिन्याहून अधिक कालावधीतच दिल्याचा दावाही करण्यात आला.