करोना-टाळेबंदीच्या कालावधीत रोख्यांचे व्यवहार दुपटीने वाढले आहेत. अंतरसोवळ्याची सक्ती ‘डिजिटल पेमेंट’ वाढवू शकली नाही, हे यावरून स्पष्ट होते.

वर्ष २०२०-२१ या चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते डिसेंबर या पहिल्या नऊ महिन्यांत अर्थव्यवस्थेतील चलनाची रक्कम २७,७०,३१५ कोटी रुपये झाली आहे. मार्च २०२० अखेर ही रक्कम २४,४७,३१२ कोटी रुपये होती. त्यात ३,२३,००३ कोटी रुपयांची भर पडली आहे. हे प्रमाण १३.२ टक्के आहे.

वर्षभरापूर्वी, एप्रिल ते डिसेंबर २०२० दरम्यान अर्थव्यवस्थेतील चलनाची वाढ निम्मी, ६ टक्के होती.

मार्च २०२० च्या मध्याला करोना साथ सुरुवातीमुळे देशव्यापी टाळेबंदी लागू झाली. या दरम्यान सामाजिक अंतर तसेच विलगीकरण यामुळे रोखीने व्यवहार कमी होणारे पर्याय व वापर वाढू लागल्याचे चित्र होते. मात्र प्रत्यक्षात अर्थव्यवस्थेत रोखीनेच अधिक व्यवहार झाल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. मध्यवर्ती बँकेने करोनामुळे उद्भवलेल्या अस्थिरतेच्या वातावरणात रोखीनेच होणारे व्यवहार वाढल्याचे ऑगस्टमध्ये म्हटले होते.

वर्ष २०२० मध्ये जानेवारी ते डिसेंबरमध्ये अर्थव्यवस्थेतील चलन ५,०१,४०५ कोटी रुपयांनी वाढून (+२२.१%) २७,७०,३१५ कोटी रुपये झाले आहे. मार्च २०२० अखेर अर्थव्यवस्थेत ५०० व २,००० रुपयांच्या नोटांचे एकत्रित प्रमाण एकूण चलनाच्या ८३.४ टक्के होते.