मुकेश अंबानी यांच्या रिलायंस इंडस्ट्रीजला दुसऱ्या तिमाहीमध्ये विक्रमी नफा झाला आहे. जुलै-सप्टेंबर या तिमाहीमध्ये तब्बल 9 हजार 516 कोटींचा शुद्ध नफा रिलायंस इंडस्ट्रीजला झाला आहे. बुधवारी कंपनीने याबाबत माहिती दिली. कोणत्याही तिमाहीमध्ये कंपनीला झालेला हा सर्वाधिक नफा आहे.

गेल्यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत यंदा 17.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीला 8,109 कोटींचा शुद्ध नफा झाला होता. कंपनीचा महसूल 54.5 टक्क्यांनी वाढला असून 1 लाख 56 हजार 291 कोटींनी वाढ झाली आहे. ”या तिमाहीमध्ये कंपनीची कामगिरी शानदार होती, आम्ही चांगला निकाल दिला. रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल क्षेत्रात चांगला व्यवहार झाला”, असं मुकेश अंबानी म्हणाले.

यापूर्वी बुधवारीच रिलायंस इंडस्ट्रीजने हॅथवे केबल आणि डेन नेटवर्कसोबत मिळून काम करणार असल्याचीही घोषणा केली आहे. या दोन्ही कंपन्यांमध्ये रिलायंस इंडस्ट्रीज 25 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याची शक्यता आहे.