आभूषण उद्योगासाठी पहिले १०० टक्के निर्यातप्रवण क्षेत्र सज्ज करणारे मुंबई हे शहर आजही रत्न व आभूषण उद्योगांसाठी सर्वात सोयीचे आणि सुरक्षित शहर आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी ज्वेल ट्रेंड्झ जेम्स अँड ज्वेलरी शोच्या उद्घाटनानिमित्त जमलेल्या बडय़ा जवाहिरांना संबोधित करताना सांगितले.
मुंबईतील नियोजित डायमंड एक्स्चेंजची मुहूर्तमेढ शेजारच्या गुजरातमध्ये नुकतीच रोवली गेल्याच्या पाश्र्वभूमीवर राज्यात सरकारकडून मिळालेली ही ग्वाही महत्त्वपूर्ण ठरते. शिंदे यांच्यासह या प्रसंगी प्रसिद्ध हिरे व्यापारी व नाइनडाइमचे संचालक संजयभाई शाह, ज्वेल ट्रेंड्झचे गोविंद वर्मा, जिग्नेश हिरानी, निशाद (मलबार गोल्ड अँड डायमंड्स), अयोध्या शेठ, अंकित जैन (मातोश्री गोल्ड) आदी सराफ मंडळी होती. यंदाच्या प्रदर्शनाच्या चौथ्या वर्षी १५० हून अधिक नामांकित जवाहिरांची दालने विलेपार्लेस्थित हॉटेल सहारा स्टार येथे थाटण्यात आली आहेत. प्रदर्शन रविवार २२ फेब्रुवारीच्या सायंकाळपर्यंत सुरू राहील.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2015 2:51 am