डिसेंबर २०१९ मध्ये रोखे, एसआयपीत २०१९ अखेरीस ओघ

मुंबई : नुकत्याच सरलेल्या २०१९च्या अखेरीस म्युच्युअल फंड मालमत्ता १३ टक्क्यांनी वाढून २६.७७ लाख कोटी रुपयांपुढे गेली आहे. फंडांमधील रोखे योजना तसेच एसआयपीना लाभलेल्या गुंतवणूकदारांच्या जोरावर फंड गंगाजळी डिसेंबरअखेरीस वार्षिक तुलनेत ३.१५ लाख कोटी रुपयांनी वाढली आहे.

देशातील विविध ४४ फंड घराण्यांची संघटना असलेल्या ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ (अ‍ॅम्फी)ने डिसेंबर २०१९ मधील म्युच्युअल फंड गंगाजळी शुक्रवारी जाहीर केली. गुंतवणूकदारांचा विश्वास वाढविण्याबाबत नियामक यंत्रणा सेबीने केलेल्या उपाययोजनाचा योग्य परिणाम दिसून आल्याचेही ‘अ‍ॅम्फी’ने म्हटले आहे.

गेल्या वर्षअखेरीसही, मालमत्ताबाबतीत एचडीएफसी म्युच्युअल फंड कंपनी ३.८२ लाख कोटी रुपयांसह अव्वल राहिली आहे, तर आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंड कंपनीची डिसेंबर २०१९ अखेरीसची मालमत्ता ३.६१ लाख कोटी रुपयांसह दुसऱ्या स्थानावर स्थिरावली.

वर्षभरापूर्वी, डिसेंबर २०१८ अखेरीस एकूण फंड मालमत्ता २३.६२ लाख कोटी रुपये होती. २०१७ मध्ये म्युच्युअल फंड गंगाजळी ५.४० लाख कोटी रुपयांनी वाढली होती.

सलग सातव्या वर्षांत फंड गंगाजळी वाढणारे वर्ष म्हणून २०१९ची नोंद झाली असून त्यापूर्वी सलग दोन वर्षे म्युच्युअल फंड मालमत्ता घसरली होती. नोव्हेंबर २००९ ते नोव्हेंबर २०१९ असा दशकाचा फंड उद्योगाचा प्रवास तिप्पट वाढला आहे.

देशातील अनेक बिगर वित्त कंपन्यांमार्फत कर्जातील मुद्दलासह व्याज थकविण्याच्या घटनेने देशातील फंड क्षेत्र गेल्या वर्षांत पुरते ढवळून गेले. त्याचबरोबर भांडवली बाजारातील स्मॉल, मिड कॅप समभागातील घसरणीचा फटकाही फंडांना बसला.