News Flash

म्युच्युअल फंडाद्वारे परिपूर्ण आर्थिक नियोजन

संपत्ती संचय, संपत्ती निर्मिती आणि संपत्तीची वाटणी असे हे तीन टप्पे आहेत.

||  राघव अय्यंगार

वयोमनानुसार लोकांच्या गरजा, आवश्यकता आणि अपेक्षा तसेच त्यांची धोका पत्करण्याची क्षमतादेखील बदलत असतात.  म्हणूनच आर्थिक नियोजन महत्त्वाचे ठरते. अशा नियोजनात आयुष्यातील तीन महत्त्वाच्या टप्प्यांचा समावेश केला गेला आहे. संपत्ती संचय, संपत्ती निर्मिती आणि संपत्तीची वाटणी असे हे तीन टप्पे आहेत.

जेव्हापासून व्यक्ती कमवायला लागतो तेव्हापासून संपत्ती संचयाचा पहिला टप्पा सुरू होतो आणि सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी पैसे गुंतवण्यासाठी सक्षमताही तेव्हाच  येते. हा टप्पा तुम्ही नोकरी-धंद्यात असता तोपर्यंत आयुष्यभर सुरूच असला तरीदेखील, नोकरी-धंद्याच्या सुरुवातीचा काळ हा जास्त महत्त्वाचा असतो. म्हणून, संपती संचयाच्या पहिल्या टप्प्यावर पाऊल टाकताच, संपत्ती निर्माणाचा दुसरा टप्पा दृष्टिपथात यायला हवा. संपत्ती निर्माण करण्यासाठी दीर्घ कालावधीची गरज असते. कारण गुंतवणूक परिपक्व होण्यासाठी आणि वाढण्यासाठी काही काळ जावा लागतो. तर सेवानिवृत्तीनंतर शेवटच्या टप्प्याची सुरुवात होते. सेवानिवृत्तीचा काळ हा आयुष्याचा दुसरा डाव म्हणून आनंदाने अनुभवायचा काळ असतो. परंतु, पहिल्या दोन टप्प्यांमध्ये जर तुम्ही गंभीरपणे आणि प्रामाणिकपणे योजनाबद्ध पद्धतीने आखणी केली असेल तरच हे शक्य होते.

म्युच्युअल फंड हे एक गुंतवणूक साधन आहे. यामध्ये, तुमच्या धोके पत्करण्याच्या क्षमतेवर आणि आर्थिक उद्दिष्टांवर आधारित असणारे विविध  गुंतवणूक पर्याय आणि योजना उपलब्ध असतात. जर तुम्हाला तुलनात्मक स्थर्याच्या दृष्टीने इक्विटी फंडात गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही लार्ज कॅप फंडात गुंतवणूक करू शकता. या खेरीज, बॅलेन्स्ड फंड आणि मासिक उत्पन्न योजनांमुळे एकाच वेळी इक्विटी आणि रोखेसंलग्न मालमत्तेत गुंतवणूक करता येऊ शकते. पारंपरिक गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी अल्प पण सुरक्षित परतावा देणाऱ्या अल्प मुदतीच्या फंडांचा पर्याय स्विकारू शकतात.

पद्धतशीर गुंतवणूक योजना अर्थात ‘एसआयपी’च्या माध्यमातून ठरावीक कालवधीत नियमितपणे गुंतवणूक करण्याचा पर्याय म्युच्युअल फंडात उपलब्ध आहे. एसआयपीच्या मदतीने तुमच्या बँक खात्यातून ठरावीक रक्कम तुमच्या निवडीच्या म्युच्युअल फंडात गुंतवण्यात येते. अशा प्रकारे, संपत्ती संचयाची काळजी घेतली जाते आणि त्याच वेळी आधी केलेल्या गुंतवणूकीमध्येदेखील वाढ होत असते. खेरीज, बाजारातील चढ-उताराकडे लक्ष न देता गुंतवणूक केली जाते आणि गुंतवणुकीच्या सरासरी किमतीला परतावा मूल्य मिळण्यास मदत होते. याचप्रकारे, संपत्तीची वाटणी करण्याच्या काळात संपत्ती संचय व निर्मितीचे फळ मिळण्याची वेळ येते तेव्हा, आपण सिस्टेमॅटिक व्रिडॉवल प्लॅन (एसडब्ल्यूपी) साठी नोंदणी करू शकतो. यामुळे गुंतवणूकदाराला गुंतवणुकीचा काही हिस्सा नियतकालिक मिळवता येतो.

अशा प्रकारे, पूर्व निर्धारित यूनिट्स/रक्कम गुंतवणूकदाराच्या निवडीनुसार पुन्हा परत केली जाते आणि ही रक्कम बँक खात्यात जमा होते. या शिवाय, बदलत्या काळानुसार गुंतवणूक प्राधान्यात बदल करण्याची गरज ओळखून, वयोमानानुसार धोका पत्करण्याच्या कमी क्षमतेनुसार जास्त जोखमीच्या गुंतवणूककडून कमी जोखमीच्या गुंतवणुकीचा स्वीकार करता येतो.

अशा परिस्थितीत, सिस्टेमॅटिक ट्रान्सफर प्लॅन (एसटीपी) चा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये ठरावीक कालावधीनंतर एका मुच्युअल फंडातील रक्कम दुसऱ्या म्युच्युअल फंडात गुंतवली जाते. खात्रीशीर आर्थिक नियोजनासाठी म्युच्युअल फंड सक्षम असतात आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी ते मदत करतात. निकडीच्या निधीचा अतिरिक्त हिस्सा लिक्विड फंडात तुम्ही ठेवू शकता आणि पारंपरिक बँक खात्यापेक्षा चांगला लाभ मिळवू शकता.

आयुष्याच्या विविध टप्प्यांवरील उपयुक्तता बघता, प्रत्येकाने  आयुष्याच्या प्रवासात म्युच्युअल फंडाला भागीदार समजले पाहिजे.

(लेखक, इंडियाबुल्स अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे मुख्याधिकारी)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 3:47 am

Web Title: mutual fund economy planning akp 94
Next Stories
1 बाजारातील चढ-उतारातही ‘अ‍ॅसेट अलोकेशन फंडा’द्वारे उमदा परतावा
2 ‘सेन्सेक्स’ची विक्रमी शिखराकडे दौड
3 दूरसंचार कंपन्यांच्या ‘बेलआऊट’ला जिओचा आक्षेप
Just Now!
X