करोनाविषाणू संक्रमण रोखण्यासाठी केलेल्या टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्थेच्या झालेल्या नुकसानाची भरपाई होण्यास नेमका किती वेळ लागेल हे आत्ताच सांगता येणार नाही, असे प्रतिपादन विविध म्युच्युअल फंडांच्या निधी व्यवस्थापकांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केले आहे.

‘क्रिसिल म्युच्युअल फंड रॅन्किंग’मध्ये (क्रमवारी) अव्वल स्थान मिळालेल्या निधी व्यवस्थापकांशी ‘लोकसत्ता’ने संवाद साधला. या संवादा दरम्यान या निधी व्यवस्थापकांना अर्थव्यवस्था नेमकी कधी व्यवस्था रुळावर येईल या बद्दल नेमका कालावधी लागेल हे सांगण्यास असमर्थता व्यक्त करतानाच नेमके किती नुकसान झाले हे समजण्यास किमान एक तिमाही तरी जाईल, असे मत व्यक्त केले.

म्युच्युअल फंडांच्या त्रमासिक कामगिरीनुसार पतनिश्चिती करणाऱ्या क्रिसिलच्या जानेवारी – मार्च २०२० कालावधीतील ‘म्युच्युअल फंड’ क्रमवारीत  कॅनरा रोबेको, एडलवाईज, एलआयसी एमएफच्या फंडांनी संबंधित फंड गटातील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अव्वल स्थान मिळविले असल्याचे नुकतेच जाहीर झाले आहे.

अपवाद वगळता बहुसंख्य कंपन्या पहिल्या तिमाहीत तोटा जाहीर करतील, चालू वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीपासून कंपन्या नफ्यात येण्यास सुरवात होईल. सरकार करोनाविषाणू संक्रमणापासून झालेल्या नुकासानावर मात करण्यासाठी प्रोत्साहनपर आर्थिक मदत घोषित होण्याची अपेक्षा आहे. या प्रोत्साहनपर आर्थिक धोरणामुळे अर्थव्यवस्थेला मूळपदावर येण्याचा कमी कालावधी लागण्याची अपेक्षा कॅनरा रोबेकोचे निधी व्यवस्थापक श्रीदत्त भांडवलदार यांनी व्यक्त केली.

आमच्या फंड घराण्याची शैली पारंपारिक प्रकारात मोडत असल्याने काही वेळेला आमचे फंड परताव्याच्या क्रमवारीत मागे पडलेले दिसले तरी बाजार घसरणीत आमच्या फंडाच्या मालमत्तेला कमीत कमी नुकसान होते. अर्थव्यवस्था रुळावर येत असताना लार्ज कॅप कंपन्यांच्या उत्सर्जनात सुधारणा दिसून येण्याची आशा असल्याने गुंतवणूकदारांनी लार्ज कॅप फंडांना झुकते माप द्यावे, असे एलआयसी एमएफ म्युच्युअल फंडांचे मुख्य गुंतवणूक अधिकारी सचिन रेळेकर यांनी व्यक्त केले.