मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भयछाया वातावरणातही गुंतवणुकीचा अधिक ओघ हा म्युच्युअल फंड पर्यायात कायम राहिला आहे. देशातील म्युच्युअल फंडातील गुंतवणूक विक्रमी टप्प्यावर पोहोचली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात फंडातील गुंतवणूक वाढली आहे.

भारतातील म्युच्युअल फंडांची शिखर संघटना असलेल्या ‘अ‍ॅम्फी’च्या मासिक आकडेवारीत फंड गंगाजळीने एप्रिलमध्ये ३२.४० लाख कोटी रुपयांचा विक्रमी टप्पा पार केल्याचे समोर आले आहे. वाढत्या निर्देशांकाच्या बरोबरीने गुंतवणूकदारांच्या उत्साहाला भरती येत असून समभाग आणि रोखे फंडात गुंतवणुकीचा ओघ सलग दुसऱ्या महिन्यात सकारात्मक असल्याचे दिसते. एप्रिलमध्ये गुंतवणूकदारांनी नव्याने ९२,९०० कोटी रुपयांची म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली. पैकी एप्रिलमध्ये ओव्हर नाइट आणि ट्रेझरी बिल्ससारख्या अल्पमुदतीच्या रोख्यांत गुंतवणूक करणाऱ्या फंडांना गुंतवणूकदारांनी पसंती दिल्याचे दिसून आले. एप्रिलमध्ये लिक्विड फंडात ४१,५०० कोटी रुपये, ओव्हर नाइट फंडात १८,५०० कोटी रुपये आणि मनी मार्केट फंडात १,७०० कोटी रुपयांचे योगदान गुंतवणूकदारांनी दिले. एप्रिलमध्ये फंड गंगाजळीची वार्षिक ३५.३० टक्के वृद्धी झाली आहे. डायनॅमिक बाँड फंड आणि कॉर्पोरेट बाँड फंडांतून मात्र गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतले. समभाग गुंतवणूक करणाऱ्या सेक्टोरिअल आणि थिमॅटिक फंडात गुंतवणुकीचा ओघ होता. शेअर बाजार निर्देशांकांच्या उच्चांकी पातळीमुळे एसआयपी गुंतवणूक एप्रिलमध्ये ८,५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.