निधी घराण्यांकडून मेमध्ये ३३ लाख कोटींचे मालमत्ता व्यवस्थापन

मुंबई : देशातील म्युच्युअल फंड गंगाजळीत महिन्याभरात जवळपास ६० लाख कोटींची भर पडली आहे. परिणामी मेअखेरीस फंड कंपन्यांचे मालमत्ता व्यवस्थापन ३३.०५ लाख कोटी रुपये अशा विक्रमी टप्प्यावर पोहोचले आहे.

विविध ४० हून अधिक म्युच्युअल फंड घराण्यांकडून एप्रिल २०२१ मध्ये ३२.३८ लाख कोटी रुपयांचे निधी व्यवस्थापन होत होते. म्युच्युअल फंड खात्यांची संख्या १० कोटींवर पोहोचली आहे. फंड कंपन्यांकडील गुंतवणुकीच्या मेमधील चढ-उताराची आकडेवारी ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ (अ‍ॅम्फी) ने बुधवारी जाहीर केली. करोना-टाळेबंदीमुळे गुंतवणूकदारांची वित्तीय नियोजन शिस्त अधिक वाढली आहे.

समभाग फंडात १०,००० कोटींची गुंतवणूक

सर्वोच्च टप्प्यावरील भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी गुंतवणूकदारांचे मनोबल वाढविल्याने समभाग म्युच्युअल फंडांत मेमध्ये गुंतवणूकदारांनी १०,००० कोटींपेक्षा अधिक रक्कम गुंतवली आहे. ही रक्कम गेल्या १४ महिन्यातील सर्वाधिक आहे. जुलै २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंतच्या सलग आठ महिने गुंतवणूकदारांनी नव्याने गुंतवणुकीकडे पाठ फिरविली होती.

यंदाचा मे हा महिना समभाग म्युच्युअल फंड वृद्धीचा सलग तिसरा महिना ठरला. आधीच्या महिन्यात या म्युच्युअल फंड प्रकारातील गुंतवणुकीत ३,४३७ तर मार्चमध्ये ९,११५ कोटी रुपयांची वाढ झाली होती. मार्चअखेरीस या पर्यायात सर्वाधिक, ११,७२३ कोटींची रक्कम होती.

* गुंतवणूकदारांनी मेमध्ये रोखे म्युच्युअल फंडातून ४४,५१२ कोटी रुपये काढून घेतले. उलट एप्रिलमध्ये त्यात १ लाख कोटी रुपये गुंतवले होते. करबचतीसाठी असलेल्या इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ईएलएसएस) मधून २९० कोटी रुपयांची जावक वगळता सर्व फंड प्रकारात मेमध्ये आवक झाल्याचे आढळून आले.

*  मेमध्ये गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड (ईटीएफ) फंडात एप्रिलमधील ६८० कोटींच्या तुलनेत २८८ कोटींची आवक झाली. तर गेल्या महिन्यात एसआयपी (नियोजनबद्ध गुंतवणूक योजना) मध्ये ८,८१९ कोटी रुपये आले आहेत. महिन्याभरापूर्वीच्या ८,५९६ कोटी रुपयांच्या तुलनेत ही रक्कम अधिक आहे.