15 October 2019

News Flash

म्युच्युअल फंडांकडे ६७९ नवीन योजनांद्वारे १.२४ लाख कोटी

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर कोणताही दुष्परिणाम झाल्याचे दिसून येत नाही.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : म्युच्युअल फंडांनी नवीन फंड प्रस्तुती (एनएफओ)द्वारे सरलेल्या २०१८ सालादरम्यान १.२४ लाख कोटी रुपये इतकी प्रचंड रक्कम जमा केली. भांडवली बाजारात सरलेले वर्ष मोठय़ा चढ-उताराचे राहिले, परंतु या अस्थिरतेचा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर कोणताही दुष्परिणाम झाल्याचे दिसून येत नाही.

देशातील म्युच्युअल फंड उद्योगाचे प्रतिनिधित्व करणारी संघटना ‘अ‍ॅम्फी’ने प्रसृत केलेल्या २०१८ सालच्या आकडेवारीनुसार, विविध फंड घराण्यांच्या या वर्षांत एकूण ६७९ नवीन योजना (एनएफओ) गुंतवणुकीसाठी खुल्या झाल्या आणि त्यातून १.२४ लाख कोटी रुपये उभारले गेले. यामध्ये ६९ एनएफओ हे मुदतमुक्त (ओपन एंडेड फंड) स्वरूपाचे आणि ६०३ मुदतबंद (क्लोज एंडेड फंड) योजना होत्या, ज्यात एफएमपी आणि पाच इंटरव्हल फंडांचाही समावेश आहे. म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी दमदार राहिलेल्या या संपूर्ण वर्षांत गुंतवणूकदारांची (फोलियोंची) संख्याही १.३ कोटींनी वाढली आहे.

गेल्या वर्षी ज्या फंड घराण्यांच्या नवीन योजना आल्या, त्यामध्ये टाटा मल्टिकॅप फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मॅन्युफॅक्चर इन इंडिया,  महिंद्रा रुरल भारत अ‍ॅण्ड कन्झम्प्शन योजना, इन्व्हेस्को इंडिया इक्विटी अ‍ॅण्ड बाँड फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल हेल्थकेयर फंड, अ‍ॅक्सिस इक्विटी हायब्रीड फंड, आदित्य बिर्ला सन लाइफ निफ्टी नेक्स्ट ५० या वेगळ्या धाटणीच्या योजना उल्लेखनीय ठरल्या आहेत.

सध्या भारत ही जगातील सर्वात वेगाने विकास पावत असलेली अर्थव्यवस्था असून, अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अनेक संधी पुढे येत आहेत. अशा स्थितीत भारताच्या अर्थवृद्धीच्या लाभार्थी उद्योगक्षेत्रात दीर्घावधीच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक ही फायद्याचीच ठरेल, हे गुंतवणूकदारांनी नेमकेपणाने हेरले आहे, असे वित्तीय नियोजनकारांचे म्हणणे आहे. म्हणूनच सरलेल्या वर्षांत उदयोन्मुख व्यवसाय क्षेत्र आणि कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी देणाऱ्या महिंद्र उन्नती इमर्जिग बिझनेस योजना गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरली. याचप्रमाणे दुर्लक्षित राहिलेल्या परंतु दमदार वाढीच्या शक्यता असलेल्या मिड-कॅप कंपन्यांबाबतही गुंतवणूकदारांना मोठय़ा आशा असल्याचे दिसून येते.

अ‍ॅम्फीच्या आकडेवारीनुसार, २०१८ सालात म्युच्युअल फंडाची एकूण गुंतवणूक गंगाजळी (एयूएम) डिसेंबर २०१७ च्या तुलनेत ५.४ टक्के वाढून २३.६१ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. परताव्याच्या दृष्टीने कामगिरी मात्र निराशाजनक राहिली. एनएसई मिड-कॅप निर्देशांकाने उणे १३.३० टक्के असा नकारात्मक परतावा दिला. त्यातही महिंद्र उन्नती इमर्जिग बिझनेस योजना २.८९ टक्के, इन्व्हेस्को इंडिया स्मॉल कॅप फंडाने ३.२७ टक्के, टाटा स्मॉल कॅप फंडाने ३.४३ टक्के, तर युनियन बॅलन्स्ड अ‍ॅडव्हांटेज फंडाने २.८७ टक्के असा सकारात्मक वार्षिक परतावा दिला आहे.

First Published on January 10, 2019 12:21 am

Web Title: mutual funds raise more than 1 lakh crore from 679 new schemes