आजवर कृषी व सहकार क्षेत्राला वित्तपुरवठा करणाऱ्या नाबार्डने प्रथमच खासगी क्षेत्रात अर्थसाहाय्य देऊ केले असून गोदामे उभारणीसाठीचे ३० कोटी रुपयांचे कर्ज एका खासगी कंपनीला दिले आहे.
‘नॅशनल कोलॅटरल मॅनेजमेंट सव्‍‌र्हिसेस’ (एनसीएमएल) या खासगी कंपनीने देशातील १० राज्यांमध्ये शेतमालाच्या साठवणुकीसाठी २५ गोदामे उभारण्याचे निश्चित केले आहे. ३,७४,५०० टन क्षमतेच्या गोदामांच्या उभारणीसाठी कंपनीला १२८ कोटींच्या नाबार्डने कर्जमंजूरी दिली आहे. पैकी ३० कोटी रुपयांचा पहिला हप्ता मंगळवारी नाबार्डचे अध्यक्ष एच. के. भानवाला यांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कौल यांच्याकडे सुपूर्द केला. हा प्रकल्प येत्या आर्थिक वर्षांत पूर्ण केला जाणार आहे.
भांडारगृहांच्या वित्तीय सहकार्यासाठी नाबार्डने भांडारगृह पायाभूत कंपनी तसेच ग्रामीण पायाभूत विकास निधीही स्थापन केला आहे. वैज्ञानिक भांडारगृह पायाभूत सुविधेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या खाद्य उत्पादनांसाठी अधिक किंमत मिळेल तसेच साठवणूक क्षमतेमुळे बाजारातील किंमत जोखमेचा सामना करण्यास सहका र्य मिळेल, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.