आजवरच्या प्रथेच्या विपरीत रिझव्‍‌र्ह बँकेचे नवे गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांपासून अंतर राखत निवृत्त गव्हर्नर रघुराम राजन यांच्याकडून सूत्रे हाती घेतली. यातून नव्या गव्हर्नराने कारकीर्दीचा प्राधान्यक्रम स्पष्ट करणारी परंपरा खंडीत झाली आहे.

राजन यांची रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नरपदाची कारकीर्द रविवारी संपली. सोमवारी, गणेश चतुर्थीनिमित्त सुटी असल्याने नवे गव्हर्नर डॉ. पटेल यांच्याकडे मंगळवारी औपचारिकरित्या त्यांनी कार्यभार सुपूर्द केला.

गव्हर्नरपदी नियुक्ती झाल्यानंतर यापूर्वी राजन यांच्यासह अन्य गव्हर्नरांनी प्रसारमाध्यमांपुढे आपल्या कारकीर्दीचे अग्रक्रम कसा असेल, हे पदार्पणालाच स्पष्ट केले आहे. राजन यांनी तर तीन वर्षांपूर्वी सूत्रे हाती घेताच दमदार सुधारणा राबविण्याचा संकल्पच सोडला होता. त्यावेळी तासाभराच्या माध्यम संवादादरम्यान त्यांनी अधिकाधिक संवाद आणि कारभारात पारदर्शकतेवर भर दिला होता.

डॉ. पटेल यांनी मंगळवारी सकाळीच दक्षिण मुंबईतील मध्यवर्ती बँकेच्या मुख्यालयात हजेरी लावली. मात्र या साऱ्या ‘बंदिस्त सोहळ्या’चे चित्रण माध्यमांना करता आले नाही.

राजन यांच्या तुलनेत पटेल हे अधिक मितभाषी आहेत. राजन यांच्या गव्हर्नरपदाच्या कारकिर्दीत एरवी तिमाहीला जाहीर होणारे पतधोरण हे दर दोन महिन्यांनी जाहीर करण्याची प्रथा सुरू केली. प्रत्येक द्वैमासिक पतधोरण मांडल्यानंतर पत्रकार परिषद आणि त्यात भारतातील राजकारण-प्रशासन तसेच आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील घटना-घडामोडींसंबंधी ते भाष्य करीत, माध्यमांना सामोरे जात आले आहेत.

राजन यांच्याप्रमाणेच अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी महागाई दरावर नजर ठेवत स्थिर व्याजदराचे पतधोरण  डॉ. पटेल हे कायम राखतील, अशी अपेक्षा अर्थतज्ज्ञ व बँकप्रमुखांनी व्यक्त केली आहे. डॉ. पटेल हे जानेवारी २०१३ मध्ये रिझव्‍‌र्ह बँकेत डेप्युटी गव्हर्नर म्हणून रुजू झाले. तीन वर्षांनंतर, जानेवारी २०१६ मध्ये त्यांची मुदत वाढविण्यात आली. रिझव्‍‌र्ह बँकेत ते पतधोरणविषयक समितीचे अध्यक्ष राहिले आहेत.