News Flash

निफ्टी अखेर १० हजार पार

सेन्सेक्सचाही नवीन विक्रम!

राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई)चा निर्देशांक ‘निफ्टी ५०’ने बुधवार सत्रअखेर १०,००० चा टप्पा पार केल्याचा आनंद औपचारिक घंटानादातून करण्यात आला. यावेळी एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम लिमये यांच्यासह आयआयएसएलचे सदस्य रवी शंकर, एनएसईचे समूह अध्यक्ष जे. रविचंद्रन, आयआयएसएलचे अध्यक्ष रवीकुमार व मुख्य कार्यकारी अधिकारी मुकेश कुमार अगरवाल उपस्थित होते.

सेन्सेक्सचाही नवीन विक्रम!

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी ५० निर्देशांकाने बुधवारी अखेर १० हजारांच्या टप्प्याला गाठलेच. तर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३२,४०० नजीक पोहोचताना नव्याने विक्रमी उच्चांकावर स्वार झाला. ५६.१० अंश वाढीसह निफ्टी १०,०२०.६५ या अभूतपूर्व पातळीवर बुधवार अखेर स्थिरावला. देशातील सर्वात मोठय़ा भांडवली बाजारासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला. त्याचवेळी सेन्सेक्सने १५४.१९ अंश वाढ नोंदवत ३२,३८२.४६ असा सार्वकालिक उच्चांकी स्तर गाठला. दोन्ही निर्देशांकांमध्ये अध्र्या टक्क्यापर्यंतची वाढ झाली. उल्लेखनीय म्हणजे दिवसअखेर निर्देशांक वरच्या टप्प्यावर बंद झाले.

कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांबरोबरच रिझव्‍‌र्ह बँकेकडून येत्या आठवडय़ात व्याजदर कपात होण्याबाबतच्या आशेने गुंतवणूकदारांना खरेदी करण्यास प्रोत्साहित केले. औषधनिर्माण, बँक, तेल व वायू क्षेत्रातील समभागांना बुधवारी मागणी राहिली. त्याचबरोबर पोलाद क्षेत्रातील वेदांता, टाटा स्टील, जिंदाल स्टील अँड पॉवर, हिंदुस्थान झिंक आदी ८.३७ टक्क्यांपर्यंत वाढले.

सेन्सेक्समधील सन फार्मा, आयसीआयसीआय बँक, महिंद्र अँड महिंद्र, हिंदुस्थान यूनिलिव्हर, सिप्ला, एनटीपीसी आदी २.१२ टक्क्यांपर्यंत वाढले. नफा वाढीचे तिमाही निकाल नोंदविणाऱ्या हिरो मोटोकॉर्प, येस बँक यांनाही मागणी राहिली.

भांडवली बाजाराच्या बुधवारच्या प्रवासाबाबत जिओजित फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे प्रमुख संशोधक विनोद नायर यांनी सांगितले की, कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांबरोबरच जुलै महिन्यातील वायदापूर्तीपूर्वी भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीचे व्यवहार केले. अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्ह यंदा व्याजदर स्थिर ठेवेल, या आशेवर आंतरराष्ट्रीय बाजारातही तेजी होती. मंगळवारच्या व्यवहारात निफ्टी १० हजारांच्या अनोख्या टप्प्यापासून माघारी फिरला होता. त्याचबरोबर सेन्सेक्समध्येही घसरण नोंदली गेली होती. एक सत्राच्या अंतराने दोन्ही निर्देशांकांनी बुधवारी नव्याने विक्रम प्रस्थापित केले. बाजारात गुरुवारी महिन्यातील वायदापूर्तीचे व्यवहार होणार आहेत.

खरेदीचे दमदार पाठबळ

अनेक बडय़ा कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निकालांमधून अर्थव्यवस्थेत दमदार उभारीचा प्रत्यय दिसून येत आहे. बरोबरच रिझव्‍‌र्ह बँकेकडून येत्या आठवडय़ात नियोजित पतधोरण बैठकीतून  व्याजदर कपात होण्याच्या आशा बळावली आहे. त्यामुळे कुंपणावर असलेल्या गुंतवणूकदारांनाही खरेदी करण्यास प्रोत्साहित केले आहे.

भारत ही जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आणि हे निफ्टी ५० निर्देशांकातून खऱ्या अर्थाने प्रतीत होत आले आहे. गेल्या काही वर्षांमधील निफ्टी ५० निर्देशांकाची भरारी ही लक्षणीय आहे. बुधवारी निर्देशांकाने ऐतिहासिक टप्पा गाठल्याबद्दल, सर्व छोटे-मोठे भागधारक, बाजारात व्यवहार करणारे सदस्य, संस्थागत गुंतवणूकदार, नियामक आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या समूहाचे मी अभिनंदन करतो. जगभरात भारताच्या आर्थिक प्रगतीचे निफ्टी ५० यापुढेही मानदंड राहिल, असा मला विश्वास आहे.  विक्रम लिमये, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, एनएसई

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2017 2:22 am

Web Title: nifty closes above 10000 mark
टॅग : Bse,Nse
Next Stories
1 सरकारने पायाभूत सुविधा प्रकल्प खासगी क्षेत्राला सोपवावेत
2 ₹ २००० च्या नोटांची छपाई बंद; ₹ २०० ची नोट पुढील महिन्यात चलनात
3 ‘निफ्टी’चा दश-सहस्त्रोत्सव!
Just Now!
X