सलग सातव्या सत्रात घसरण नोंदविणाऱ्या निफ्टीने मंगळवारी ८,००० चा स्तर गाठला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या या निर्देशांकाची ही २७ ऑक्टोबर २०१४ नंतरची सुमार पातळी ठरली, तर २६,५०० खाली येणाऱ्या सेन्सेक्सने सलग सहाव्या व्यवहारात घसरण नोंदविताना गेल्या चार महिन्यांतील दीर्घ आपटी नोंदविली.
दिवसभरात ८,०५७.१५ पर्यंत पोहोचणाऱ्या निफ्टीने दिवसअखेर सोमवारच्या तुलनेत २१.७५ अंश घसरणीसह ८.०२२.४० पर्यंतचा प्रवास अनुभवला, तर ४१.८४ अंश आपटीने सेन्सेक्स २६,४८१.२५ वर येऊन ठेपला. मुंबई निर्देशांकांची गेल्या सहा व्यवहारांतील घसरण तब्बल १,३७० अंशांची राहिली आहे.
आठवडय़ापूर्वी रिझव्‍‌र्ह बँकेने पाव टक्का दर कपातीच्या सादर केलेल्या पतधोरणानंतर भांडवली बाजारातील घसरण कायम आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास आणि कमी मान्सूनची चिंता गुंतवणूकदारांच्या मनावर कायम आहे. मंगळवारच्या नकारात्मक व्यवहारावरही वेधशाळेच्या नव्या कमी पावसाची छाया राहिली.
मुंबईच्या शेअर बाजारात आरोग्यनिगा, माहिती तंत्रज्ञान, वाहन आदी क्षेत्रांतील समभागांची विक्री झाली. सेन्सेक्समध्ये औषधनिर्माण क्षेत्रातील सिप्लाचा समभाग घसरणीत सर्वात वर राहिला, तर वधारणेत ३.१ टक्क्य़ांसह वेदांता वरचढ ठरला. मात्र तिच्या विलीन होण्याच्या चर्चेतील केर्न इंडियाच्या समभाग मूल्यात मात्र घसरण झाली. आयसीआयसीआय बँक, स्टेट बँकसारख्या बँक समभागांमध्ये वाढ झाली. त्याचबरोबर हिंदाल्को, टाटा मोटर्स, टाटा पॉवरही उंचावले. सेन्सेक्समधील डॉ. रेड्डीज, सन फार्मा, विप्रो, बजाजसह १८ समभागांचा घसरणीत राहिले.