मंगळवारच्या घसरण विश्रांतीनंतर मुंबई निर्देशांक बुधवारी नव्याने विक्रमावर स्वार झाला. या सत्रातील २२१.५५ अंश तेजीनंतर सेन्सेक्स ४०,४६९.७८ या नव्या सार्वकालिक उच्चांकावर विराजमान झाला. दिवसाच्या व्यवहारात निर्देशांक ४०,६०६.९१ पर्यंत झेपावला होता.

सेन्सेक्सने सप्ताहारंभीच ४०,३०१.९६ अंशावर सूर मारणारी  विक्रमी कामगिरी बजावली होती.

गुंतवणूकदारांच्या बँक तसेच वित्तीय क्षेत्रातील समभाग खरेदीने साथ दिल्याने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी अर्धशतकी निर्देशांक वाढीने १२ हजारासमीप पोहोचला. सत्रअखेर निफ्टी ४८.८५ अंश वाढीसह ११,९६६.०५ अंशांवर स्थिरावला. दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये जवळपास अध्र्या टक्क्याची वाढ झाली.

सुस्तावलेल्या अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था देण्यासाठी नजीकच्या भविष्यात आणखी काही उपाययोजना केल्या जातील, या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुंबई दौऱ्यात दिलेल्या आश्वासनाचा सकारात्मक परिणाम भांडवली बाजारात दिसला.

कंपन्यांचे अपेक्षेपेक्षा सरस तिमाही वित्तीय निष्कर्ष, डॉलरच्या तुलनेत भक्कम रुपया याचीही दखल बाजाराने घेतली. सेन्सेक्समध्ये आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एचडीएफसी लिमिटेड, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, कोटक महिंद्र बँक, अ‍ॅक्सिस बँक, लार्सन अँड टुब्रो, येस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर आदी २.६४ टक्क्यांपर्यंत वाढले.

मुंबई निर्देशांकाच्या समभाग मूल्य घसरणीच्या यादीत भारती एअरटेल, रिलायन्स, बजाज फायनान्स, ओएनजीसी, एचसीएल टेक, आयटीसी, सन फार्मा आदी ३.३१ टक्क्यांसह राहिले. तिमाही तोटय़ाने बजाज फायनान्स ९ टक्क्यांहून अधिक प्रमाणात घसरला.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बँक, वित्तीय तसेच स्थावर मालमत्ता, पोलाद, माहिती तंत्रज्ञान, भांडवली वस्तू आदी २.६० टक्क्यांपर्यंत वाढले. तर ग्राहकपयोगी वस्तू, दूरसंचार, ऊर्जा निर्देशांक ५.३० टक्क्यांपर्यंत घसरले. मिड कॅप व स्मॉल कॅपची संमिश्र हालचाल राहिली.

आगामी कल..

अर्थप्रोत्साहक घोषणांनी भांडवली बाजार वरच्या टप्प्यावर पोहोचला आहे. बाजारात स्थावर मालमत्ता तसेच बँक, वित्तीय समभागांमध्ये बुधवारी मूल्यउसळी दिसली. निवळणाऱ्या जागतिक व्यापार युद्धाचीही दखल गुंतवणूकदारांनी घेतली आहे. कंपन्यांच्या सकारात्मक तिमाही वित्तीय निष्कर्षांनेही बाजारात चैतन्य आणले आहे.

*  विनोद नायर, प्रमुख संशोधक, जिओजित फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस.

स्थावर मालमत्ता क्षेत्रात केंद्र सरकारने खऱ्या अर्थाने  आर्थिक सुधारणा राबविल्यास त्याचा लाभ विकासक, बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांना होईल.

*  संदीप सभरवाल, बाजार विश्लेषक

तांत्रिकदृष्टय़ा निफ्टी निर्देशांकात तेजीचा कल कायम आहे. १२,००३ हा प्रतिकार स्तर ओलांडल्यास आणखी तेजी दिसून येईल. घसरण आल्यास ११,८६१-११,९२१ हे महत्वाचे आधार स्तर असतील.

* दिपक जसानी, एचडीएफसी सिक्युरिटीज