नवी दिल्ली : म्यानमारच्या सैन्याशी असलेल्या संबंधाचे कारण पुढे करत नोर्वेस्थित निवृत्ती वेतन निधी वित्तसंस्था केएलपीने भारताच्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीतील गुंतवणूक काढून घेतली आहे. ही रक्कम १०.५ लाख डॉलरची आहे.

अदानीचे म्यानमार सैन्याबरोबरचे व्यावसायिक संबंध केएलपीच्या व्यवसाय मार्गदर्शक तत्त्वाकरिता जोखमेचे असल्याचे समर्थन यासाठी करण्यात आले आहे. तीन विदेशी कंपन्यांच्या अदानी समूहातील विविध कंपन्यांमधील गुंतवणुकीने गेल्याच आठवडय़ात भांडवली बाजारात समभाग मूल्यफटका अनुभवणाऱ्या अदानी समूहापुढे यामुळे नवे संकट उभे राहिले आहे.

म्यानमार सैन्याच्या मालकीची जागा भाडेतत्त्वावर घेऊन अदानी पोर्ट यांगोन शहरात मालवाहतूक हाताळणी केंद्र साकारत आहे. या घडामोडीकडे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचेही लक्ष आहे. म्यानमार सैन्याच्या संबंधित ठिकाणच्या फेब्रुवारीमधील वेगवान हालचाली पाहता गुंतवणूकदार अधिक सजग झाले आहेत.

अदानी समूहातील उपकंपन्यांना अर्थसाहाय्य करणाऱ्या तीन विदेशी कंपन्यांचे निधीखाते ‘एनएसडीएल’मार्फत गोठवण्याच्या चर्चेनंतर भांडवली बाजारात सूचिबद्ध अदानी संबंधित कंपन्यांच्या समभाग मूल्यांनी गेल्या आठवडय़ात भांडवली बाजारात त्यांचा किमान स्तरमूल्य अनुभवला होता. अदानी एंटरप्राईजेस (-२४.९९%), अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (-१८.७५%); अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी पॉवर (प्रत्येकी जवळपास -५%) यांचे मूल्य आपटले होते.