जर्मनीच्या आघाडीच्या फोक्सवॅगन या मोटार उत्पादक कंपनीला भारतातील धोकादायक वायू उत्सर्जन पातळीचे उल्लंघन केल्याबाबत सरकारने नोटीस जारी केली आहे.
पुण्यातील एआरएआय या संस्थेने फोक्सवॅगन गाडय़ांच्या तपासणीचा अहवाल सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. एआरएआयने दिलेल्या अहवालानुसार जेट्टा, ऑक्टाव्हिया, ऑडी ए ४ व ऑडी ए ६ या भारतातील मोटारींमधून बाहेर सोडली जाणारी प्रदूषणकारी उत्सर्जने अधिक आहेत. एआरएआयच्या संचालक रश्मी उध्र्वरेषे यांनी सांगितले की, आम्ही फोक्सवॅगन वाहनांचे प्रदूषण मोजले आहे ते रस्त्यावर व प्रयोगशाळेत वेगळे आहे. जेट्टा, ऑक्टाव्हिया, ऑडी ए ४ ऑडी ए ६ या मॉडेल्समध्ये हा फरक दिसून आला आहे. आम्ही या कंपनीला नोटीस दिली असून त्याच्या उत्तरानंतर पुढील कारवाईची दिशा ठरवली जाईल. जड उद्योग खात्याचे अतिरिक्त सचिव अंबुज शर्मा यांनी सांगितले की, आम्ही फोक्सव्ॉगन समूहाला नोटीस दिली आहे व तांत्रिक माहिती देऊन भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. पुण्यातील एआरएआय या संस्थने दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, फोक्सवॅगन मोटारींचे प्रयोगशाळेत तपासलेले प्रदूषण व प्रत्यक्ष रस्त्यावर गाडय़ा धावतात तेव्हाचे प्रदूषण यात फरक आहे.