ग्राहकांना बँकेच्या खात्यात रोख जमा करायची झाल्यास काही बँकांनी त्यासाठी उपलब्ध केलेल्या रोख स्वीकारणाऱ्या यंत्रांचे आता एटीएमच्या धर्तीवर ‘नॅशनल फायनान्शियल स्विच (एनएफएस)’शी जुळलेले एकत्रित जाळे तयार करण्याचा रिझव्‍‌र्ह बँक विचार करीत आहे. त्यामुळे ग्राहकांना स्वत:हून केव्हाही, कुठेही बँक खात्यात कुणाच्या मध्यस्थीविना स्वचालित पद्धतीने रोख रक्कम जमा करता येईल.
सध्याच्या घडीला बँकांचे एटीएम हे एनएफएस जाळ्याशी जुळलेले आहेत, तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन (एनपीसीआय)ने या जाळ्यामध्ये रोखीत ठेवी स्वीकारणाऱ्या यंत्रांचाही समावेश करण्याची सूचना केली आहे. ग्राहकांना त्यामुळे प्रत्यक्ष बँकेच्या शाखेत न जाता कोणत्याही यंत्राद्वारे खात्यात रोख जमा करण्याची सोय उपलब्ध होऊ शकेल, असे रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एच. आर. खान यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. देना बँकेच्या स्वयंसेवा धर्तीवर ई-स्मार्ट सुविधेच्या उद्घाटनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ग्राहकांना दैनंदिन बँकिंग व्यवहारांसाठी अधिकाधिक पर्यायी सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी यामागे कल्पना असल्याचे खान यांनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने राबविलेला कोणताही सेवा उपक्रम हा फायदा मिळवून देणाराच असायला हवा. तथापि नफा आणि ग्राहकांची सोयीस्करता याचे नेमके संतुलनही विसरले जाऊ नये, असे त्यांनी बँकांअंतर्गत एटीएम वापराच्या शुल्कावरून निर्माण झालेल्या तिढय़ावर भाष्य करताना मत व्यक्त केले. रिझव्‍‌र्ह बँकेने वाढत्या ‘फिशिंग’ कारवायांच्या पाश्र्वभूमीवर सायबर गुन्ह्य़ांबाबत दक्षतेवर भर दिला असल्याचे त्यांनी सांगितले.