इलेक्ट्रॉनिक्स आणि ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील जपानची महाकाय तंत्रज्ञान कंपनी तोशिबा कॉर्प.ने मंगळवारी तिचे अध्यक्ष शिगेनोरी शिगा यांनी मुख्यत: अणुऊर्जा व्यवसायातील ७१३ अब्ज येन (६.३ अब्ज डॉलर, साधारण ४२,२०० कोटी रुपये) इतक्या कंपनीच्या तोटय़ाची जबाबदारी स्वीकारत पदत्याग केला असल्याचे जाहीर केले.

मंगळवारी कंपनीचे टोक्यो येथील मुख्यालयात भरगच्च पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. अणुऊर्जा व्यवसायातील जबर तोटय़ाच्या पाश्र्वभूमीवर तोशिबाने आपली आर्थिक कामगिरी जाहीर करणे महिनाभर लांबणीवर टाकले आहे. त्यातच अध्यक्ष पायउतार झाल्याच्या वार्तेने कंपनीच्या समभागाचे मूल्य भांडवली बाजारात आठ टक्क्य़ांनी गडगडले. लवकरच कंपनीचा बिगर-लेखापरीक्षित ताळेबंद जाहीर केला जाईल. प्रत्यक्षात ताळेबंदातील तोटय़ाचे प्रमाण हे सद्य अंदाजापेक्षा अधिक असू शकेल, असा खुलासाही कंपनीचे प्रवक्ते सातोशी सुनाकावा यांनी पत्रकार परिषदेत केला. कोणत्याही कंपनीने नियोजित वेळापत्रकाला टाळून आर्थिक कामगिरी उशिराने जाहीर करण्याचा प्रकार जपानसाठी अभूतपूर्व आहे.

अमेरिकेतील वेस्टिंगहाऊस येथे प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीचा खर्च पूर्वअंदाजित रकमेपेक्षा खूप अधिक वाढल्याच्या परिणामी तोशिबाचा तोटा फुगत गेला आहे. तो भरून काढण्यासाठी कंपनीला आपल्या नफ्यातील इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील मालमत्ता विकाव्या लागण्याचीही शक्यता आहे; तथापि नव्याने कोणताही अणुऊर्जा प्रकल्प हाती न घेण्याचे कंपनीचे धोरण असेल, असेही सुनाकावा यांनी स्पष्ट केले.