21 January 2018

News Flash

ऑलिव्ह ऑईल ५० टक्क्यांनी महागले

ऑलिव्ह ऑईलच्या किंमती गेल्या सहा महिन्यात तब्बल ५० टक्क्यांनी वधारल्या आहेत. रुपयातील घसरण, कच्च्या मालातील वाढ यांचा फटका या खाद्य तेलाच्या दरवाढीवर परिणाम करणारा ठरला

व्यापार प्रतिनिधी, मुंबई | Updated: January 18, 2013 1:00 AM

ऑलिव्ह ऑईलच्या किंमती गेल्या सहा महिन्यात तब्बल ५० टक्क्यांनी वधारल्या आहेत. रुपयातील घसरण, कच्च्या मालातील वाढ यांचा फटका या खाद्य तेलाच्या दरवाढीवर परिणाम करणारा ठरला आहे. यामुळे आगामी कालावधीत भारतात ऑलिव्ह ऑईलच्या किंमती ४० टक्क्यांपर्यंत चढय़ाच राहतील. त्याचे दृश्य परिणाम मार्च, एप्रिलपासून दिसून येतील.
‘इंडेक्समंडी डॉट कॉम’ आणि ‘टीट्रोनॅचरल डॉट इट’ यांच्यानुसार जाहीर करण्यात आलेल्या किंमतीनुसार इटली आणि स्पेनच्या वायदे बाजारांमध्ये गेल्या सहा महिन्यात ऑलिव्ह ऑईलच्या किंमती ३२ ते ५२ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. ‘इंडियन ऑलिव्ह असोसिएशन’चे अध्यक्ष व्ही. एन. दालमिया यांनी भारतात ऑलिव्ह ऑईलच्या किंमती कमीत कमी प्रमाणात वाढविण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे. ऑलिव्ह ऑईलचे सर्वाधिक उत्पादन होणाऱ्या इटली आणि स्पेन या दोन देशांमधून भारताने एप्रिल ते सप्टेंबर २०१२ या कालावधीत ४,५२७ टन ऑलिव्ह ऑईल आयात केले आहे. वार्षिक तुलनेत ते ६४ टक्के अधिक आहे. एकूण आयात ऑलिव्ह ऑईलपैकी ९० टक्के तेल या दोन भागातून भारत वर्षांला आयात करतो.
वर्षांला १५ लाख टन ऑलिव्ह ऑईलचे उत्पादन घेणाऱ्या स्पेनमधील यंदाचे पिक दुष्काळामुळे कमी झाले आहे. त्यात यंदा ५० टक्क्यांपर्यंत, ६ ते ७ लाख टन घसरण झाली आहे. त्यामुळे एकूण          जागतिक पातळीवर ऑलिव्ह ऑईलचे उत्पादन  केवळ ३० लाख टन होण्याची शक्यता आहे. वार्षिक तुलनेत त्यातही ८ लाख टनांपर्यंत घट येण्याचे संकेत आहेत.

First Published on January 18, 2013 1:00 am

Web Title: olive oil prices rise by over 50
  1. No Comments.