भारतातील स्मार्टफोन बाजारामधील अव्वल क्रमांकावर असणाऱ्या सॅमसंग तसेच अॅपल कंपन्यांना वन प्लसने जोरदार धक्का दिला आहे. ३० हजारहून अधिक रुपये किंमतीच्या प्रिमियम स्मार्टफोन सेक्शनमध्ये वन प्लसने सॅमसंगला मागे टाकले आहे. हॉगकाँगमधील काऊंटरपॉइण्ट रिचर्स या संस्थेने सादर केलेल्या अहवालानुसार एप्रिल-जून या तिमाहीमधील वन प्लसचा भारतामधील खप हा मागील वर्षाच्या ९ टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत गेला आहे.

वन प्लसने प्रिमियम स्मार्टफोन कॅटेगरीमध्ये पहिल्या क्रमांकावर येण्यामागील इतर महत्वाचे कारण म्हणजे या तिमाहीमध्ये त्यांनी वन प्लस सिक्स हे नवीन मॉडेल लॉन्च केले आहे. वन प्लसने ऑफलाइन बाजारातही प्रवेश केल्याने त्याचाही फाय़दा कंपनीला झाल्याचे दिसून आले आहे. या कारणांबरोबरच स्पर्धक कंपन्यांची वाईट कामगिरीमुळे वन प्लसला फायदा झाल्याचे दिसून येत आहे. आयत शुल्क कमी होत नसल्यामुळे अॅपलसारख्या कंपन्यांना एका मर्यादेनंतर आपल्या फोनची किंमत कमी करता येत नसल्याने ते या किंमत आणि फिचर्सचा मेळ साधणाऱ्या परवडणाऱ्या प्रिमियम फोनच्या स्पर्धेत मागे पडताना दिसत आहेत. भारतामधील स्मार्टफोन बाजारपेठेत ३० हजारहून अधिक किंमत असणाऱ्या फोन्सच्या बाजारपेठेची टक्केवारी ३ टक्के इतकी असली तरी महसूलाच्या क्षेत्रात ही टक्केवारी १२ टक्के आहे. ३० हजारावर किंमत असणारी भारतातील स्मार्टफोनची बाजारपेठ वर्षाला १९ टक्क्यांच्या वेगाने वाढताना दिसत आहे.

एकीकडे वन प्लसने मोठी उडी घेतलेली असतानाच पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या सॅमसंगची पिछेहाट झाली आहे. बाजारातील एकूण ३५ टक्के वाटा सॅमसंग तर पहिल्यांदाच अॅपलचा वाटा चक्क १४ टक्क्यांवर आला आहे. वन प्लसबरोबरच इतर चायनिज फोन ब्रॅण्डसही या प्रिमियम स्मार्टफोनच्या बाजारपेठेत जम बसवण्यास सज्ज झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने हुवाई, ओप्पो, व्हिवो, झिओमी या कंपन्यांचा समावेश आहे.

महसुलाच्याआधारे भारतामधील पाच अव्वल स्मार्टफोन कंपन्या

सॅमसंग
२०१८ मध्ये ३१.२० टक्के
२०१७ मध्ये २८.९० टक्के
तोटा २.३० टक्के

झिओमी
२०१८ मध्ये २१.९० टक्के
२०१७ मध्ये १३.६० टक्के
नफा ८.३० टक्के

व्हिवो
२०१८ मध्ये १३.६० टक्के
२०१७ मध्ये १३.३० टक्के
नफा ०.३० टक्के

ओप्पो
२०१८ मध्ये ११.३० टक्के
२०१७ मध्ये १२.४० टक्के
तोटा ०.९० टक्के

वन प्लस
२०१८ मध्ये ४ टक्के
२०१७ मध्ये १.२० टक्के
नफा २.८ टक्के

(सर्व आकडेवारी एप्रिल जून तिमाहीनुसार बाजाराच्या एकूण टक्केवारीच्या प्रमाणात)

३० हजारांहून अधिक किंमतीच्या बाजारपेठेतील टॉप तीन कंपन्या

वन प्लस
२०१८ मध्ये ४.५० टक्के
२०१७ मध्ये ८.८० टक्के
वाढ ३१.७० टक्के

सॅमसंग
२०१८ मध्ये ३४.४० टक्के
२०१७ मध्ये ५४.३० टक्के
घट १९.९० टक्के

अॅपल
२०१८ मध्ये १३.६० टक्के
२०१७ मध्ये २९.६० टक्के
घट १६ टक्के

(सर्व आकडेवारी एप्रिल जून तिमाहीनुसार बाजाराच्या एकूण टक्केवारीच्या प्रमाणात)

माहिती स्त्रोत: काऊण्टर पॉइण्ट रिसर्च