१५ वर्षापासून थकलेल्या १,५१४ कोटींची वसुली

सुमारे दीड दशकांपूर्वी देशभरात फैलावलेल्या एजंटच्या जाळ्यातून कोटय़वधी गुंतवणूकदारांकडून प्रचंड रक्कम ठेव रूपात उभी करणाऱ्या पीयरलेस जनरल फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंटने अखेर १,५१४ कोटी रुपये सरकारदफ्तरी जमा केले आहेत. कंपनीने गेल्या १५ वर्षांपासून ही रक्कम थकविली होती आणि देशभरातील १ कोटीहून अधिक ठेवीदारांना हा मोठा दिलासा आहे.

केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीत कंपनी कायदा, २०१३ अन्वये स्थापित गुंतवणूकदार संरक्षण निधी ‘इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड-आयईपीएफ’ने हा १,५१४ कोटी रुपयांचा निधी पीयरलेसकडून मिळविला आहे. देशभरातील ३० राज्य व केंद्रशासित प्रदेशातील सुमारे १ कोटीच्या आसपास ठेवीदारांच्या १.४९ कोटी ठेवपत्रांद्वारे पीयरलेसकडून हा निधी उभा केला गेला होता. यातील ५०.७७ टक्के ठेवपत्रे ही प्रत्येक २,००० रुपये व त्याहून कमी रकमेची आहेत. यातील बहुतांश ठेवीदार पश्चिम बंगालमधील आणि निम्न उत्पन्न गटातील आहेत. किंबहुना पीयरलेस जनरल फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट कंपनीने गाशा गुंडाळल्यानंतर, तिच्या एजंट्सकडून शारदा चिटफंड घोटाळा निर्माण केला गेल्याचेही आढळून आले आहे.

जमा झालेल्या रकमेतून पीयरलेसच्या पात्र ठेवीदारांना परतफेड लवकरच सुरू केली जाणार आहे. त्यासाठी ‘आयईपीएफ’कडून ठेवीदारांची ओळख पटवणारी ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली जाईल.

‘आयईपीएफ’ने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांच्या हितरक्षणासाठी विविध कंपन्यांना चार हजारांहून अधिक नोटिसा पाठविल्या आहेत. ज्यात भागधारकांच्या खात्यात लाभांश जमा न करणे, लाभांश वितरित केला मात्र समभाग हस्तांतरित केले नाहीत, अशा कंपन्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात यातून या गुंतवणूकदार संरक्षण निधीला ४,१३८ कोटी रुपयांची गंगाजळी निर्माण करता आली आहे. यात दावा न केली गेलेली लाभांश रकमेचाही समावेश आहे. शिवाय, पात्र भागधारकांना न्याय मिळवून देत विविध कंपन्यांना २१,२३२ कोटी रुपये मूल्याचे ६५.०२ कोटी समभाग हस्तांतरित करण्यास तिने भाग पाडले आहे.